सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणाऱ्यांच्या यादीत दादा दुसरे

आज दुपारी मांडणार अकरावा अर्थसंकल्प

सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणाऱ्यांच्या यादीत दादा दुसरे

मुंबई: प्रतिनिधी

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे आज दुपारी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून सादर केलेल्या हा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळे सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्र्यांच्या यादीत अजित पवार हे दुसऱ्या क्रमांकावर येणार आहेत.

शेषराव वानखेडे यांच्या नावावर सर्वाधिक 13 अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम आहे. अजित पवार यांच्यानंतर दहा अर्थसंकल्प सादर केलेल्या जयंत पाटील यांचा क्रमांक लागतो तर त्यांच्या खालोखाल नऊ अर्थसंकल्प सादर करणारे सुशील कुमार शिंदे यांचे नाव आहे. 

अजित पवार सादर करणार असलेल्या अर्थसंकल्पाबाबत सर्वाधिक चर्चा आहे ती लाडक्या बहिणींना दिल्या जाणारा दीड हजार रुपयांचा निधी 2100 पर्यंत वाढवणार का, याच्याबद्दल आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्या सर्व नेत्यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिला जाणारा निधी वाढविण्याचे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी दिले होते. या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या भरघोस यशात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक योगदान असल्याचेही महायुतीच्या नेत्यांनी वारंवार मान्य केले आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात सरकार आपल्या आश्वासन पूर्ण करणार का, याबद्दल उत्सुकता आहे. 

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आर्थिक पाहणी अहवालात राज्याची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याच्या महसुली उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक आहे. त्यातही कर्ज आणि व्याजाची परतफेड करण्यात अधिक निधी खर्च होत असून विकास कामांसाठी निधी अपुरा असल्याचेही या अहवालात दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी काय घेऊन येणार हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us