'महाकुंभ हा एकतेचा महायज्ञ"
भाविकांच्या गैरसोयीबद्दल पंतप्रधानांनी मागितली माफीही
नवी दिल्ली: प्रतिनिधी
प्रयागराज येथे पार पडलेला महा कुंभ सोहळा म्हणजे एकतेचा महायज्ञ असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्याचप्रमाणे महा कुंभाचे आयोजन हे एक मोठे आव्हान असून त्यात झालेल्या भाविकांच्या गैरसोयीबद्दल त्यांनी माफी देखील मागितली. भारतीय परंपरेत मातेचे स्थान देण्यात आलेल्या गंगा, यमुना, सरस्वती यांच्या सेवेत आमच्याकडून काही त्रुटी राहिली असेल तर त्यांनी देखील आम्हाला माफ करावे, असे भावपूर्ण विधानही त्यांनी केले.
महाकुंभ सोहळ्याच्या समारोपाचे औचित्य साधून पंतप्रधान मोदी यांनी याबाबतच्या आपल्या भावना समाज माध्यमांवर व्यक्त केल्या आहेत.
देशातील 140 कोटी जनतेच्या श्रद्धा जेव्हा एखाद्या ठिकाणी व्यक्त होतात ते दृश्य अद्भुत असते. असेच दृश्य प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर महा कुंभाच्या निमित्ताने आपल्याला अनुभवायला मिळाले. महाकुंभ हा केवळ एक धार्मिक उत्सव नाही तर देशाच्या सांस्कृतिक एकात्मतेचा अविष्कार आहे. जेव्हा एखादे राष्ट्र आपल्या विचारांना पडलेली दास्यत्वाची साखळी तोडून स्वतंत्रपणे आणि मुक्तपणे विचार करू लागतो तेव्हाच महाकुंभासारखा आविष्कार घडतो, असे मोदी यांनी नमूद केले.
महाकुंभमेळ्याचे आयोजन 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत प्रयागराज येथे करण्यात आले. या काळात 66 कोटी 21 लाख भाविकांनी सहभाग घेतल्याची माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. नजरबंदी करणारी आतषबाजी आणि लेझर शो यांच्या आयोजनाने महाकुंभाचा समारोप करण्यात आला.
Comment List