संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव
जुने प्रकरण करून काढण्याचा जयकुमार गोरे यांचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त केलेले सन 2017 मधील प्रकरण उकरून काढून आपल्याला हेतुपुरस्सर बदनाम केले आहे, असा आरोप करून मंत्री जयकुमार गोरे यांनी संजय राऊत यांच्यासह एक यूट्यूब चॅनलच्या संचालकांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला.
संजय राऊत यांनी गोरे यांच्यावर महिलेला विवस्त्र छायाचित्र पाठवल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी न्यायालयाने सन 2019 मध्ये आपली निर्दोष मुक्तता केलेली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. असे असताना त्याच प्रकरणात पुन्हा आपल्यावर आरोप करणे हा न्यायालयाचा आणि सार्वभौम सभागृहाचाही अवमान आहे, असे गोरे यांनी नमूद केले.
त्याचप्रमाणे 'लय भारी' या youtube चॅनेलने तब्बल 87 ध्वनी चित्रफिती प्रसिद्ध करून आपली व आपल्या कुटुंबाची बदनामी केली आहे. या चॅनेलवरून तब्बल अडीच वर्षापासून ताळतंत्र सोडून आपली बदनामी केली जात आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमांनी जबाबदारीने वागले पाहिजे. भाषेचा स्तर राखला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून गोरे यांनी या चॅनलचे संचालक तुषार खरात यांच्या विरोधात देखील हक्कभंग प्रस्ताव सादर केला.
राज्यपालांकडे सादर करण्यात आलेल्या एका निवेदनामुळे या प्रकरणाची सुरुवात झाली. शासनाने हे निवेदन चौकशीसाठी पोलिसांकडे दिले. निवेदनावर ज्या व्यक्तीची सही होती त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ही सही आपली नसल्याचे सांगितले. मग राज्यपालांकडे खोटे निवेदन देऊन आपली आणि कुटुंबाची बदनामी करणे, या सर्वांची चौकशी होणे गरजेचे आहे, असे देखील गोरे म्हणाले.
Comment List