आजपासून माथेरान पर्यटकांसाठी बेमुदत बंद
प्रशासनाच्या बेफिकिरीबद्दल स्थानिकांचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी
मुंबईपासून जवळच असलेले पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ माथेरान हे आजपासून पर्यटकांसाठी बेमुदत काळ बंद करण्याचा निर्णय स्थानिक नागरिकांनी घेतला आहे. या पर्यटन स्थळी पर्यटकांची होणारी लूट, त्यामुळे माथेरानची होणारी बदनामी आणि या सगळ्याबद्दल स्थानिक प्रशासनाची बेफिकिरी याचा निषेध म्हणून माथेरानच्या नागरिकांनी हा निर्णय घेतला आहे.
माथेरान मध्ये मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांना विविध प्रकारच्या सेवा देऊन किंवा विविध वस्तूंची विक्री करून त्यावर आपला उदरनिर्वाह करण्यासाठी कर्जत सारख्या जवळपासच्या ठिकाणाहून अनेक लोक येथे येत असतात आणि आपला व्यवसाय करत असतात. मात्र, त्यापैकी काही लोक पर्यटकांची फसवणूक आणि लूटमार करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
विशेषतः एका youtuber ने माथेरान येथील घोडेवाल्यांकडून पर्यटकांची कशी लूट केली जाते, हे आपल्या युट्युब चॅनेल वरून नजरेस आणन दिल्यानंतर. या प्रकाराला वाचा फुटली आहे. अशा प्रकारांमुळे माथेरानची बदनामी होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला हे प्रकार बंद करण्याची विनंती केली. त्याकडे दीर्घकाळ लक्ष न दिल्यामुळे नागरिकांनी पर्यटकांसाठी माथेरान बंद करण्याचा इशाराही दिला. तरीही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्षच केले. याप्रकरणी स्थानिक नागरिक, माथेरान गिरीस्थान परिषद, वनविभाग आणि पोलीस यांची संयुक्त बैठक देखील झाली. मात्र या बैठकीतूनही काहीही निष्पन्न न झाल्याने नागरिकांनी माथेरान बेमुदत काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Comment List