अमेरिकेच्या हुतींवरील हल्ल्याची संपूर्ण योजना उघड
ट्रम्प प्रशासनाची गंभीर चूक
वॉशिंग्टन: वृत्तसंस्था
अमेरिकेने हुती बंडखोरांवर निर्णायक हल्ले चढविण्यासाठी आखलेली योजना थेट एका पत्रकारापर्यंत पोहोचली. त्याने त्यावर लेख लिहून प्रत्यक्ष योजनेसह प्रसिद्ध केला. त्यामुळे ट्रम्प प्रशासनाची गंभीर चूक उघड झाली असून प्रचंड खळबळ माजली आहे.
अमेरिकेने हुती बंडखोरांवर हल्ला करण्यासाठी एक योजना आखली होती. त्यामध्ये या हल्ल्यांचे वेळापत्रक, त्यासाठी वापरली जाणारी लष्करी साधने व शस्त्रास्त्रे, सैन्य संख्या याचे काटेकोर नियोजन होते. या योजनेची माहिती उपराष्ट्राध्यक्ष, संरक्षण मंत्री, परराष्ट्रमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि सर्व गुप्तहेर यंत्रणांचे प्रमुख यांच्यापर्यंत सीमित ठेवण्यात आली होती. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सिग्नल या ओपन सोर्स प्लॅटफॉर्मवर हुती पीसी स्मॉल ग्रुप या नावाने समूह तयार करण्यात आला होता. त्यावर ही योजना सविस्तरपणे देण्यात आली होती.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वॉल्ट्स यांनी 'दि अटलांटिक' या मासिकाचे संपादक जेफ्री गोल्डबर्ग यांना या समूहात जोडण्याची विनंती केली. त्यानुसार जेफ्री यांना या समूहात सहभागी करून घेण्यात आले. त्यामुळे हुतींवरील हल्ल्याच्या योजनेची माहिती त्यांना अंमलबजावणीपूर्वीच मिळाली. त्यांनी त्यावर सविस्तर लेख लिहून आपल्या मासिकात प्रसिद्ध केला.
या लेखामुळे अमेरिकन प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली. सुरुवातीला ही योजना कशी फुटली, याचा अचंबा सर्वांना वाटला. अमेरिकन प्रशासनातच कोणी गद्दार आहे का, याची चाचपणी सुरू झाली. त्यानंतर या अत्यंत गोपनीय समूहात पत्रकाराचा समावेश असल्याची बाब निदर्शनास आली. जेफ्री गोल्डबर्ग हा एक अत्यंत धोकेबाज माणूस असल्याची टीका संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी केली आहे.