महाराष्ट्र बँक सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेकडून सामाजिक कृतज्ञता निधी समर्पण
सामाजिक कामासाठी यावर्षी ७९ सामाजिक संस्थांना एकतीस लाख रकमेची मदत.
पंचवीस वर्षात रुपये तीन कोटी रकमेचा निधी समर्पण
पुणे: प्रतिनिधी
"समाजकार्यात सेवानिवृत्त बँक कर्मचारी, अधिकारी किती सक्षम असू शकतात ज्यांच्या आर्थिक मदतीमुळे व सामाजिक कार्यातून समाजाला दिशा व प्रेरणा मिळते हे बँक ऑफ महाराष्ट्र निवृत्त कर्मचारी संघटनेने गेल्या पंचवीस वर्षात भरीव कामगिरी करून दाखविले आहे," असे प्रतिपादन गडचिरोली येथील सामाजिक कार्यकर्ते व "आम्ही आमच्या आरोग्यासाठी" संस्थेचे संस्थापक डॉ सतीश गोगुलवार यांनी केले.
भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉइज वेलफेअर ऑर्गनायझेशनद्वारा आयोजित नवी पेठ येथील निवारा सभागृहात "सामाजिक कृतज्ञता निधी समर्पण" समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ गोगुलवार बोलत होते. डॉ गोगुलवार यांनी पुढे सांगितले, "आदिवासी बांधवांशी संवाद सुरू केल्यानंतर तेथील लोकांच्या प्रश्नाचा अभ्यास केला.आरोग्य,रोजगार याचबरोबर सेंद्रिय शेती कडे देखील लक्ष देण्याची गरज आहे तेथील हवामानातील बदल ही लक्षात घेतला पाहिजे.त्याप्रमाणे तेथे कार्य केले पाहिजे".
या वेळी शुभदा देशमुख यांनी गडचिरोली येथील महिलांसाठी बचतगट द्वारे चालणाऱ्या विविध उपक्रमाची तसेच महिला सक्षमीकरणासाठी करत असलेल्या कार्याची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक बाळासाहेब फडणवीस होते. नारायण अचलेरकर, मोहन घोळवे, भास्कर माणकेश्वर, संतोष गदादे, डॉ सुनील देशपांडे, शुभदा देशमुख, अर्चना सोहनी, डॉ संजय बारगजे यांची यावेळी मुख्य उपस्थिती होती.
"दरवर्षी समाजात काम करणाऱ्या विविध संस्थांच्या प्रकल्पाची व कार्याची पाहणी केली जाते. समाजातील उपेक्षित, दिव्यांग, गतिमंद, एड्सग्रस्त, तसेच अनेक वैद्यकीय सेवा, पर्यावरण, कृषी, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थांना संघटनेच्या सदस्यांनी स्वतःचे पैसे टाकून आत्तापर्यंत तीन कोटी रुपयांपर्यंत मदत केली असल्याचे बँक ऑफ महाराष्ट्र निवृत्त कर्मचारी संघटनेचे महासचिव नारायण अचलेरकर यांनी यावेळी सांगितले.भविष्यातहीअसे समाजकार्य चालूच राहील अशी ग्वाही या वेळी दिली.यावेळी स्मरणिकेचे प्रकाशनही पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
आदर्श गो सेवा, महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय संस्था, स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्था, नर्मदालय, अल्पपरिवार, आरोग्य भारती, भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान, चैतन्य ज्ञानपीठ, आस्था फाउंडेशन, प्रीतम फाऊंडेशन, शिवसमर्थ संस्था, सिद्धार्थ सामाजिक विकास संस्था यासह एकूण ७९ संस्थांना यावर्षी निधी वितरित करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक नारायण अचलेरकर यांनी केले. बाळासाहेब फडणवीस यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. मोहन घोळवे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. पाहुण्याचा परिचय मनीषा साने ह्यांनी करून दिला. मुकुंद भस्मे यांनी आभार मानले. पसायदान ऋजुता सरोदे यांनी गायिले
कार्यक्रमास सेवा संस्थांचे प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र बँकेतील देशभरातून आलेले प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.