लष्करी अधिकाऱ्याकडून लष्करी अधिकाऱ्याचीच फसवणूक
जमीन खरेदी करून देण्याचे आमीष दाखवून लाखो रुपयांना चुना
पुणे: प्रतिनिधी
कोकणात जमीन खरेदी करून देण्याच्या बहाण्याने लष्करी अधिकाऱ्यानेच समकक्ष लष्करी अधिकाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून लष्कर मुख्यालयाने फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ केले आहे.
या प्रकरणातील तक्रारदार लेफ्टनंट कर्नल प्रताप रजनीश सिंग हे सन 2012 मध्ये हैदराबाद येथे नेमणुकीला असताना त्यांची लेफ्टनंट कर्नल डी एस पाटील यांच्याशी ओळख झाली. ओळख झाल्यानंतर अनेक ठिकाणी बदल्या होऊन देखील दोघांमध्ये प्रत्यक्ष भेटी आणि दूरध्वनीद्वारे संपर्क कायम होता. लेफ्टनंट कर्नल पाटील यांनी लेफ्टनंट कर्नल सिंग यांना कोकणातील एका जमिनीची माहिती देऊन या जमिनीची खरेदी फायदेशीर ठरेल, असे सांगितले.
रत्नागिरी जिल्हा, राजापूर तालुक्यातील करक येथे 80 गुंठे व अंबोलगड येथे 22 गुंठे जमीन विक्रीसाठी आहे. ही जमीन चांगली असून ती खरेदी केल्यास भविष्यात चांगला फायदा मिळू शकतो, असे लेफ्टनंट कर्नल पाटील यांनी लेफ्टनंट कर्नल सिंग यांना वारंवार सांगितले. लेफ्टनंट कर्नल सिंग यांनी प्रथम या जमीन खरेदीत आपल्याला रस नसल्याचे लेफ्टनंट कर्नल पाटील यांना सांगितले. मात्र, लेफ्टनंट कर्नल पाटील यांनी सतत आग्रह केल्यामुळे त्यांनी ही जमीन घेण्यास संमती दिली.
या जमीन खरेदीच्या व्यवहारासाठी लेफ्टनंट कर्नल पाटील यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या विविध बँक खात्यांवर वेळोवेळी लेफ्टनंट कर्नल सिंग यांनी तब्बल 37 लाख रुपये पाठविले. मात्र त्यानंतर जमीन खरेदीचा व्यवहार झालाच नाही. लेफ्टनंट कर्नल सिंग यांनी लेफ्टनंट कर्नल पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला असता लेफ्टनंट कर्नल पाटील यांनी या व्यवहाराबाबत उत्तर देण्यास टाळाटाळ केली.
अखेर जमिनीचा व्यवहार होत नसेल तर आपण दिलेले सदतीस लाख रुपये परत द्यावे, अशी मागणी लेफ्टनंट कर्नल सिंग यांनी केली. त्यावर सध्या पैसे देणे शक्य नसल्याचे सांगत जमिनीचे खरेदी खत करण्यासाठी आणखी आठ लाख रुपये देण्याची मागणी लेफ्टनंट कर्नल पाटील यांनी केली.
दरम्यान, लेफ्टनंट कर्नल पाटील यांच्याकडून कर्नल साहब हरिष जोशी, कर्नल बिनालकर आणि माजी सैनिक हितेश यांची देखील फसवणूक झाल्याची बाब लेफ्टनंट कर्नल सिंग यांच्या निदर्शनास आली. त्यावरून आपली देखील फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार सन 2022 मध्ये लेफ्टनंट कर्नल पाटील यांच्या विरोधात लष्करी मुख्यालयात तक्रार दाखल करण्यात आली. लष्कराने अंतर्गत चौकशी करून लेफ्टनंट कर्नल पाटील यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली व लेफ्टनंट कर्नल सिंग यांना लेफ्टनंट कर्नल पाटील यांच्या विरोधात पोलिसात तक्रार देण्याचे आदेश दिले. त्यानुसार लेफ्टनंट कर्नल सिंग यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून येरवडा पोलीस पुढील तपास करीत आहेत.