गर्जा महाराष्ट्र माझा...
महाराष्ट्र हाच देशाच्या अर्थव्यवस्थेचा ऊर्जास्रोत
मुंबई: प्रतिनिधी
गुजरात किंवा कर्नाटक नव्हे तर महाराष्ट्र हेच देशातील सर्वाधिक समृद्ध राज्य ठरले असून महाराष्ट्र हाच देशाच्या अर्थव्यवस्थेचा ऊर्जास्रोत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने प्रसिद्ध केलेल्या एका दस्तावेजात सन 2023- 24 मध्ये महाराष्ट्र सकल राष्ट्रीय उत्पादनात देशात अग्रेसर असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सकल राष्ट्रीय उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा सन 2023- 24 मध्ये 13.3 टक्के एवढा राहिला आहे. हेच प्रमाण सन 2021- 22 मध्ये 13 टक्के एवढे होते. मागील आर्थिक वर्षात या काही प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, सन 2010- 11 मध्ये हे प्रमाण 15.2 टक्के एवढे होते. त्या तुलनेत महाराष्ट्राचा सकल राष्ट्रीय उत्पादनातील वाटा काही प्रमाणात घटला असला तरी देखील महाराष्ट्र आजही इतर राज्यांपेक्षा आघाडीवरच आहे.
नव्या कंपन्यांच्या नोंदणीतही महाराष्ट्राची बाजी
नव्या कंपन्यांच्या नोंदणीत देशाची राजधानी असलेल्या दिल्लीला मागे टाकत महाराष्ट्राने बाजी मारली आहे. एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत महाराष्ट्रात तब्बल 21 हजार नव्या कंपन्यांची नोंदणी झाली आहे. याच कालावधीत दिल्लीत 12 हजार 759 कंपन्यांची नोंदणी झाली तर उत्तर प्रदेशमध्ये 15 हजार 590 नव्या कंपन्यांची नोंद करण्यात आली. या आकडेवारीत उत्तर प्रदेश देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
दरडोई उत्पन्नाबाबत मात्र महाराष्ट्र पिछाडीवर
सकल राष्ट्रीय उत्पादनात महाराष्ट्र देशात आघाडीवर असला तरी देखील दरडोई उत्पन्नाबाबत मात्र हे राज्य पिछाडीवर आहे. दरडोई उत्पन्न बाबत सिक्कीम, दिल्ली, तेलंगणा, गोवा, हरियाणा अशी आकाराने लहान असलेली राज्य आघाडीवर असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातील दरडोई उत्पन्न देखील उल्लेखनीय आहे.