रहिवासी मालमत्तांची बाजारपेठ मंदावली
वाढत्या किमती आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेचा परिणाम
पुणे: प्रतिनिधी
रहिवासी मालमत्तांच्या वाढत्या किमती आणि जागतिक अर्थव्यवस्थेत निर्माण झालेली अनिश्चिततेची स्थिती यामुळे देशभरात रहिवासी मानुमतांची बाजारपेठ मंदावल्याचे चित्र आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत रहिवासी मालमत्तांच्या व्यवहारात देशभरात 28 टक्के घट झाली आहे. पुणे शहरात हेच प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
एनारॉक या रिअल इस्टेट कन्सल्टन्सी संस्थेने देशातील सात मेट्रोपॉलिटीन शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार सन 2025 या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात देशभरात केवळ 93 हजार 280 रहिवासी मालमत्तांची विक्री झाली आहे. मागील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत हीच संख्या एक लाख तीस हजार एवढी होती.
मुंबई महानगरक्षेत्रात निवासी मालमत्तेच्या विक्रीमध्ये 26 टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत या क्षेत्रात 42 हजार 920 घरांची विक्री झाली होती तर या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत केवळ 31 हजार 610 घरांची विक्री झाली आहे.
हैदराबादमध्ये तर यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत घरांच्या विक्रीचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत जवळजवळ निम्म्यावर आले आहे. (49 टक्के) मागील वर्षी पहिल्या तिमाहीत हैदराबादमध्ये 19 हजार 660 घरांची विक्री झाली तर यावर्षीच्या पहिल्या तिमाहित हे प्रमाण दहा हजार शंभर पर्यंत खाली आले आहे.
बंगळुरू शहरात निवासी इमारतींच्या विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत 16 टक्क्यांची घट झाली आहे. दिल्ली राजधानी परिसर, पुणे, चेन्नई आणि कोलकाता या महानगरांमध्ये देखील मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत घर विक्रीचे प्रमाण अनुक्रमे 20, 30, 26 आणि 31 टक्क्यांनी घटले आहे.
निवासी मालमत्तांच्या वाढलेल्या किमती हे विक्रीत घट होण्यामागचे प्रमुख कारण मानले जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सात महानगरांमधील निवासी मालमत्तांची किंमत दहा ते 34 टक्क्यांनी वाढलेली आहे. दिल्ली राजधानी परिसर आणि बंगळूरू या ठिकाणी घरांच्या किमतीतील वाढ सर्वाधिक 34 टक्के आणि 20 टक्के एवढी आहे.
देशातील सात महानगरांमध्ये विकल्या न गेलेल्या निवासी मालमत्तांची संख्या तब्बल पाच लाख साठ हजार एवढी मोठी आहे. आलिशान घरांची बाजारपेठ तुलनेने स्थिर असली तरी देखील मध्यमवर्गीयांना आवश्यक असलेल्या घरांच्या किमती त्यांच्या आवाक्यात न राहिल्याने निवासी मालमत्तांच्या बाजारपेठेला मोठा धक्का बसला आहे.