'आठ दिवसात संपूर्ण कारभार मराठीतून चालवा'
मनसैनिकांचा पुण्यातील बँकांना इशारा
पुणे: प्रतिनिधी
महाराष्ट्रातील विविध आस्थापनांचा कारभार मराठीतच चालला पाहिजे, असे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडवा सभेत दिल्यानंतर आठ दिवसाच्या आत आपल्या शाखांचे सर्व कारभार मराठीतून चालवा, अशा अर्थाचे निवेदन पुण्यातील मनसैनिकांनी विविध बँकांना दिले आहे. याची दखल घेतली न गेल्यास 'खळ्ळ खट्यक' आवाज निघाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही बँकांना देण्यात आला आहे.
मराठी बाबत आग्रही असलेले राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत राज्यातील आस्थापनांचा कारभार मराठीतून चालला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली विविध बँकांच्या शाखांना भेटी देऊन त्यांच्या कामकाजाची पाहणी केली.
ज्या बँकेत मराठीतून कारभार चालत नाही, अशा बँकांना मनसेच्या वतीने सज्जड इशारा देण्यात आला आहे. पुढच्या आठ दिवसात ज्या बँका आपला कारभार मराठीतून चालविणार नाहीत त्या बँकांमध्ये मनसे स्टाईलने गाल रंगवत खळ्ळ खट्यक आवाज ऐकायला येतील, असा इशारा मनसेने दिला आहे.