विनोद ही संकल्पना प्रत्येकाच्या मनात: भाऊ तोरसेकर
मेनका प्रकाशनच्या खमंग टमंग च्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात
पुणे::प्रतिनिधी
"विनोद ही संकल्पना प्रत्येकाच्या मनात असते आणि विनोद लेखनही प्रत्येकाला सुचत असते तथापि पूर्वतयारी करूनही विनोदी लेखन करता येत नाही",असे मत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी शनिवारी व्यक्त केले.मेनका प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या आणि ज्येष्ठ पत्रकार भगवान दातार लिखित 'खमंग टमंग' या खुमासदार पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पुण्यातील टिळक रोड येथील न्यू इंग्लिश स्कूल मधील गणेश सभागृहात शनिवारी (दिनांक ५) पार पडला.'खमंग टमंग' चे प्रकाशन तोरसेकर यांचे हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते
ज्येष्ठ पत्रकार प्रवीण टोकेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.मेनका प्रकाशन चे व्यवस्थापकीय संचालक अभय कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.
भाऊ तोरसेकर म्हणाले की विनोद गुदगुल्या करणारा असावा त्यात ओरखडे काढलेले नसावेत.एखाद्याला डिवचून विनोद करता येत नाही तुमचा हेतू काय यावर विनोदाचा अर्थ ठरत असतो अधिकाऱ्याच्या घोड्यावर जबाबदारी बसते तेंव्हा ती संविधानिक होते.माध्यमामुळे चळवळी संपल्या.अनेक चळवळी केवळ कॅमेऱ्या पुरत्या उरलेल्या आहेत असे वक्तव्य त्यांनी केले.डोळ्यासमोरच्या बातम्या पत्रकारांना दिसत नाहीत फक्त पत्रकार परिषदेतल्या बातम्या सध्याचे पत्रकार करतात अशी टीकाही त्यांनी एकांगी पत्रकारिता करणाऱ्यावर केली.
प्रवीण टोकेकर म्हणाले,की विनदात वैर नसते वैरभाव माणसांमध्ये असतो.विनोद हा दोस्तांच्या कोंडाळ्यात रमणारा असतो.विनोद हा मैत्री करू शकतो पण विनोद शस्त्र वगैरे नसते.विनोदी लेखन ही एक कसरत असते.त्याला एक मर्यादा आहे आपण ती पाळली पाहिजे.अपमान करणे हा नवीन प्रकार सध्या विनोदाच्या नावाखाली रुळला आहे.हे सांगताना ते म्हणाले की,स्टँड अप कॉमेडी च्या नावाखाली कुणाल कामराने जे केले त्याला विनोद म्हणता येत नाही.महाराष्ट्र नावाची एक व्यवस्था आहे त्याला कुणाल कामरा विचारत नाही त्यामुळे कुणाल कामराला विनोदवीर म्हणणे ही गफलत होत आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
खमंग टमंग पुस्तकाचे लेखक भगवान दातार यांनी पुस्तक लिहिण्यामागची भूमिका स्पष्ट केली.ते म्हणाले की,सध्याच्या काळात राजकीय दांभिकतेवर भाष्य करण्यासाठी उपहास आणि विडंबन याचा शस्त्र म्हणून वापर करण्यात येतो या प्रकारच्या लेखनशैलीमध्ये वापर करीत तत्कालीन राजकीय नेते प्रसंग आणि घटना यावर भाष्य करणारे लेखन केले हे सांगतांना त्यांनी शरद पवार,उद्धव ठाकरे,बाळासाहेब थोरात यांच्यामुळे लेखनाची प्रेरणा मिळाली,असेही त्यांनी नमूद केले.हे सांगताना त्यांनी अभय कुलकर्णी यांनी भगवान दातार यांनी त्यांचे लिखाण प्रसिद्ध करण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला केतकी दातार हिने सरस्वती स्तवन सादर केले.भगवान दातार यांनी प्रमुख पाहुण्यांचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.नाट्यकर्मी सुधीर मोघे यांनी सूत्रसंचालन केले.जेष्ठ संपादक मल्हार अरणकल्ले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.आरती देशपांडे ह्यांनी आभार मानले.
कार्यक्रमास राज्यातील मध्यम क्षेत्रातील प्रतिनिधी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.