अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणीच्या निधीत कपात
आठ लाख महिलांना दीड हजारांऐवजी मिळणार पाचशे रुपये
मुंबई: प्रतिनिधी
नमो शेतकरी निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या तब्बल आठ लाख लाडक्या बहिणींना यापुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत दीड हजार रुपयांऐवजी केवळ पाचशे रुपये मिळणार आहेत. एका लाभार्थीला दोन शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही, या नियमांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेत मिळणारा निधी आणि नमो महासन्मान निधी यातील फरकाची रक्कम म्हणून लाडक्या बहिणींना पाचशे रुपये देण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी निधी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेनुसार केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींना दरमहा पाचशे रुपये राज्य सरकारकडून दिले जातात. किसान सन्मान निधी योजनेतून लाभार्थींना दरमहा पाचशे रुपयांचा निधी मिळतो.
राज्य सरकारने केलेल्या पडताळणीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण यजनेचा लाभ घेणाऱ्या आठ लाख महिला नमो शेतकरी निधी योजनेचाही लाभ घेत आहेत, असे निदर्शनास आले. त्यामुळे अशा महिलांना या महिन्यापासून लाडकी बहिणी योजनेअंतर्गत दीड हजार रुपये न दिले जाता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणि नमो महासन्मान निधी योजना यातून मिळणारे दरमहा एक हजार रुपये वगळून उर्वरित पाचशे रुपये महिना दिले जाणार आहेत.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत नऊ महिने निधी जमा करण्यात आला आहे. मात्र, एप्रिल महिन्याचा निधी अद्याप जमा करण्यात आलेला नाही. तो अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच 30 एप्रिल रोजी लाभार्थींच्या खात्यावर जमा होणार आहे, अशी माहिती शासकीय सूत्रांकडून देण्यात आली.