या वर्षीचा मान्सून शेतकऱ्यांना देणार दिलासा
सरासरीपेक्षा अधिक पावसाचा हवामान संशोधन संस्थांचा अंदाज
पुणे: प्रतिनिधी
या वर्षीचा मान्सून शेतकऱ्यांना आणि आता उन्हात होरपळणाऱ्या सर्वसामान्यांनाही दिलासा देणारं असल्याचा दावा भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि खाजगी हवामान संशोधन संस्था स्कायमेट यांनी केला आहे. या वर्षी सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडेल, असा त्यांचा अंदाज आहे.
या वर्षीचा उन्हाळा तुलनेने अधिक कडक आहे. मे महिना सुरू होण्यापूर्वीच काहिली होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, या वर्षी पावसाळा सुखद ठरण्याची चिन्ह आहेत. सध्या कार्यरत असलेला अल निनो हा हवामानशास्त्रीय घटक कमकुवत होत असून मान्सून येईपर्यंत तो पूर्ण निष्प्रभ होईल आणि पावसाला पोषक असणारा ला निना हा घटक कार्यरत होईल. त्यामुळे या वर्षी पर्जन्यमान चांगले राहील, असे हवामनशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या वर्षी ८७ से मी पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार भारतात या वर्षी पर्जन्यमान सामान्य स्वरूपाचे असणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार या वर्षी ८३ टक्के म्हणजे ८६८. ६ मि मी पाऊस पडेल. यात पाच टक्के घट किंवा वाढ होऊ शकते. जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी तर जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज आहे.