वाढदिवसाच्या केकवर दंड संहितेतील कलमांची नक्षी
सराईत गुंडाला पोलिसांनी केले जेरबंद
मुंबई: प्रतिनिधी
आपल्या वाढदिवसाच्या समारंभात केकवर भारतीय दंड संहितेतील विविध कलमांची. नक्षी रेखाटणारा भांडुप येथील सराईत गुन्हेगार झिया अन्सारी याला पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्यावर आत्तापर्यंत खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
अन्सारी याने सोमवारी त्याचा वाढदिवस साजरा केला. त्या समारंभासाठी आणलेल्या केकवर आईसिंगने अन्सारी यांच्यावर दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांच्या कलमांच्या आकड्यांची त्यासमोर प्रश्नचिन्ह काढून नक्षी काढण्यात आली होती. या प्रकारांचे चित्रण व छायाचित्र समाज माध्यमातून प्रसिद्ध झाली.
केकवर ३०२, ३०७, ३२६, ३८७ ही कलमे काढण्यात आली होती. तसेच अन्सारी याने यावेळी, 'पुढील गुन्ह्यांची प्रतीक्षा आहे,' असे उद्गार काढून अधिक गंभीर गुन्हे करणार असल्याचे सूचित केले, असे प्रत्यक्षदर्शी सूत्रांनी पोलिसांना सांगितले आहे. त्याची दखल घेऊन पोलिसांनी अन्सारी याला त्वरित अटक करून कसून चौकशी सुरू केली आहे.
अन्सारी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर कारागृहाबाहेर आला आहे. त्यानंतर काही दिवसातच आपल्या वाढदिवशी हा उद्योग करून त्याने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच पोलीस त्याच्या मुसक्या बांधून त्याची चौकशी करत आहेत. तसेच त्याच्या तडीपारीचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे.