ग्रीन नेटच्या शीतल छत्र छायेत खरेदीसाठी तुळशीबाग सज्ज!
सामाजिक बांधिलकीतून स्तुत्य उपक्रम : आमदार हेमंत रासने यांच्याहस्ते लोकार्पण
पुणे : शहरात खरेदीचा आनंद घ्यावयाचा असेल तर सर्वं महिलांकडे एकच पर्याय असतो तो म्हणजे ‘तुळशीबाग’. परंतू एप्रिल महिना अर्धा ही संपला नाही आणि तापमान ४० अंशांवर पोहचले आहे. या वरून मे महिन्यात उष्णता किती तीव्र असणार आहे याचा अंदाज येऊ शकतो. हीच गोष्ट लक्षात ठेऊन संपूर्ण तुळशीबागेत ग्रीन नेट बसवून सर्वांना खरेदीचा आनंद घेण्याचा संकल्प घेण्यात आला. कदाचित देशात प्रथमच असे घडले असेल. त्यामुळे भर उन्हाळ्यात ही शितल छत्र छायेत माताभगिनींचा तुळशीबागेतील खरेदीचा आनंद द्विगुणित होणार आहे.
नगर पथ विक्रेता समिती, पुणे मनपा आणि अध्यक्ष हॉकर्स आघाडी पुणे शहर भाजपा यांच्या संयुक्त विद्यमाने सागर सुनिल दहिभाते यांच्या संयोजनाने तुळशीबागेत जवळपास चार टप्प्यांमध्ये एक किलो मीटर ग्रीन नेट बसविण्यात आली आहे. ही ग्रीन नेट बँक ऑफ महाराष्ट्र पासून श्री गजानन मंडळ ट्रस्ट, ज्वेलरी बोर्ड, कावरे कोल्ड्रींक्स आणि तुळशीबाग गणपती मंदिरापर्यंत जवळपास सर्व क्षेत्र व्यापले आहे. त्यामुळे महिला ग्राहक आणि दुकानदार यांना आनंद झाला.
निमित्त होते आमदार हेमंत रासने यांच्या वाढदिवसाचे. त्यांनी याचे औचित्य साधून तुळशीबागेत उन्हाच्या चटक्यापासून ग्राहकांना वाचविण्यासाठी आपल्या निधीतून ग्रीन नेट बसविण्यात आली. त्याचे उदघाटन रासने यांच्याच हस्ते करण्यात आले. यावेळी स्थानिक गणेशोत्सव मंडळ, व्यापारी वर्ग, ग्राहक असे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार हेमंत रासने म्हणाले," लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मी सर्वस्वी प्रयत्न करतोय. तुळशीबागेतील व्यापारी, पथारी विक्रेता, गणेश मंडळे, येथील लोकांच्या आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी मी वचनबद्ध आहे. येथे ग्रीन नेट बसवून ग्राहकांना सावली देण्याचा जो सामाजिक उपक्रम आहे तो अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. ज्या प्रमाणे देशात इंदौर शहर सर्वात सुंदर असून येथे देशातील लोक शहर पाहावयास येतात. तसेच आता कसबा क्षेत्र पाहण्यासाठी देशातील नागरिक येथे नक्कीच येतील. ”
या प्रसंगी उपस्थित महिलांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पुस्तके वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रविण सोनार यांनी केले. साई डोंगरे यांनी आभार मानले.
000