'मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागणे हाच मोठा गुन्हा'
आदित्य ठाकरे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र
नाशिक: प्रतिनिधी
बीडचा 'आका' कोण आहे हे माहिती असताना देखील धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी विलंब का लागला? अशी कोणती मैत्री मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आड आली, की ज्यामुळे ते आपल्याच पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या संतोष देशमुख यांना न्याय देऊ शकले नाहीत, असे सवाल करत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी, मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागणे हाच मोठा गुन्हा असल्याचे नमूद केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संपवलेले टोळी युद्ध महायुती सरकारच्या काळात पुन्हा सुरू झाल्याची टीका ही त्यांनी केली.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या निर्धार मेळाव्यात ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली.
बीड आणि परभणीचे प्रकरण झाले. बीडचा आका कोण आहे, हे सर्वांना माहिती आहे. तरी देखील संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्याच्या आरोप पत्रात दाखल करण्यात आलेली छायाचित्र प्रसिद्ध झाल्यावर राज्यभरात संतापाची लाट उसळली. त्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला. एवढा विलंब का लागला? अशी कोणती मैत्री आड आली? गृहमंत्री स्वतःच्याच कार्यकर्त्याला का न्याय देऊ शकले नाहीत, अशा प्रश्नांची सरबत्ती ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर केली.
भाजपचे लोकच हिंदू विरोधी
भारतीय जनता पक्ष हिंदुत्ववादाचे नारे देत असला तरी देखील त्यांच्याच काही नेत्यांची भाषणे ऐकली तर भाजपाचे लोकच हिंदू विरोधी असल्याचे स्पष्ट दिसून येते. भाजपनेस हिंदुत्वाचा त्याग केला आहे. यांच्या सरकारने वक्फ सुधारणा कायदा आणला आहे. मात्र, या कायद्याने कोणाचेही बरे होणार नाही, अशी टीकाही ठाकरे यांनी केली. सिद्धिविनायक मंदिराची जागा देखील वक्फ बोर्डाकडे जाणार असल्याची अफवा भाजपच्या लोकांनी पसरवणचा आरोप त्यांनी केला.
राज्याला मुख्यमंत्री आहे की नाही?
देवेंद्र फडणवीस गृहमंत्री, मुख्यमंत्री असताना राज्यात खून, बलात्काराचे सत्र सुरू झाले. युती सरकारच्या कार्यकाळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गुंडांमधील टोळी युद्ध संपुष्टात आणले होते. महायुती सरकारच्या कार्यकाळात ते पुन्हा सुरू झाले आहे, असा आरोपही ठाकरे यांनी केला. असे गृहमंत्री बघायला मिळतील का, असा प्रश्न करतानाच राज्याला मुख्यमंत्री आहे की नाही, अशी परिस्थिती उद्भवली असल्याची टीका त्यांनी केली. तब्बल 18 वर्ष केंद्रातील सरकार आणि पंतप्रधान पद भारतीय जनता पक्षाकडे असताना रोहिंगे आणि बांगलादेशींनी घुसखोरी कशी केली, असा सवाल करतानाच ज्या ऑल इंडिया द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाने वक्फ सुधारणा कायद्याला विरोध केला त्याच्याशीच भाजपने युती केल्याची टीका देखील त्यांनी केली.