आता धावत्या रेल्वेमध्येही मिळणार एटीएममधून पैसे
पंचवटी एक्सप्रेसमध्ये चाचणी यशस्वी
नाशिक: प्रतिनिधी
भारतीय रेल्वे सातत्याने प्रवाशांना नवनव्या सुविधा देण्याच्या प्रयत्नात आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणूनधावत्या रेल्वेमध्येही प्रवाशांना एटीएममधून पैसे काढण्यासह इतर सुविधा उपलब्ध होणार आहेत. नासिकमार्गे मनमाड ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये या सुविधेची यशस्वी चाचणी पार पडली आहे. लवकरच या सुविधेची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.
पंचवटी एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये नियमितपणे ये जा करणारे नोकरदार व व्यापारी यांची संख्या अधिक आहे. या प्रवाशांना अनेकदा रोकड रकमेची तसेच अन्य बँकिंग सुविधांची आवश्यकता असते. ही गरज लक्षात घेऊन भारतीय रेल्वेच्या भुसावळ मंडळाच्या बैठकीत प्रथम रेल्वेमध्ये एटीएम सुविधा उपलब्ध करून देण्याची कल्पना मांडण्यात आली. भुसावळ मंडळाच्या प्रशासनाने यावर त्वरित कार्यवाही करून बँक ऑफ महाराष्ट्राच्या सहकार्याने पंचवटी एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्यामध्ये एटीएम सुविधाची चाचणी घेतली.
या सुविधेला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे रेल्वेच्या भुसावळ मंडळाचे व्यवस्थापक इति पांडे यांनी सांगितले. हे एटीएम मशीन वातानुकूलित डब्यात बसविण्यात आले असले तरी देखील पंचवटी एक्सप्रेस चे सर्व 22 डबे आपल्या बाजूने एकमेकांना जोडण्यात आलेले असल्यामुळे सर्वच प्रवासी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. या सुविधा द्वारे रोख रक्कम काढण्याबरोबरच चेकबुक मागविणे आणि बँक स्टेटमेंट घेणे या सुविधा देखील प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.
पंचवटी एक्सप्रेसमधील एटीएमची चाचणी पूर्णतः यशस्वी झाली आहे. रेल्वेच्या या मार्गावरील बहुतेक सर्व ठिकाणी एटीएम मशीन पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे दिसून आले. केवळ कसारा, इगतपुरी या डोंगरी भागात तसेच बोगद्यांमध्ये या मशीनला कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे त्याच्या कामात खंड पडला. इतर सर्व ठिकाणी हे मशीन उत्तम प्रकारे सेवा देऊ शकले आहे, असा दावा पांडे यांनी केला.
पंचवटी एक्सप्रेसचे तीन डबे हिंगोलीला जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेस ला जोडले जातात. त्यामुळे हिंगोली ला जाणाऱ्या प्रवाशांना देखील एटीएम सुविधा उपलब्ध होणार आहे. या एटीएमच्या सुरक्षेसाठी बंद करता येऊ शकणारे किऑस्क वापरण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे एटीएम मशीन 24 तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली असणार आहे. या सुविधेला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद लाभला तर अन्य महत्त्वाच्या एक्सप्रेसमध्ये देखील ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, असेही पांडे यांनी सांगितले.