'होय! मोदी, शहा यांच्या नेतृत्वाखालीच आमची वाटचाल'
संजय शिरसाट यांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर
मुंबई: प्रतिनिधी
होय! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आमचे पक्षप्रमुख आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली आमची वाटचाल सुरू आहे. त्याच्याशी तुम्हाला काय करायचे आहे? तुम्ही काश्मीरला जाऊन राहुल गांधींची गळाभेट घेतली त्याचे काय, अशा शब्दात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.
अमित शहा हे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आहेत. महायुतीत सहभागी असलेले भारतीय जनता पक्षासह तिन्ही पक्ष अमित शहा चालवतात, अशी टीका राऊत यांनी केली होती.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्याची देखील राऊत यांनी , आमरस पुरी खायला गेले, अशा शब्दात खिल्ली उडविली आहे. त्याचाही समाचार शिरसाट यांनी घेतला. एकनाथ शिंदे हे संवाद साधणारे, समन्वय ठेवणारे नेते आहेत. त्यांना पक्षभेदाशी काही कर्तव्य नसते, असे सांगतानाच, आपली ताकद वाढविण्यासाठी इतरांची मदत घेतली तर बिघडले कुठे, असा सवालही केला. राऊत वगैरे मंडळी इतरांच्या पक्षात डोके घालणारी आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
त्यांच्या पक्षाचे विसर्जनही नाशिकमध्येच
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा नाशिकमध्ये होत असलेला निर्धार मेळावा हा निर्धार मेळावा नसून बचाव मेळावा आहे, अशी टीका करतानाच शिरसाट यांनी ठाकरे गटाचे विसर्जन देखील नाशिकमध्येच होईल, असे भाकीतही वर्तवले. ज्यांच्यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे, अशांना या मेळाव्यापासून दूर ठेवले आहे. कदाचित त्यांना त्याची जाणीव करून देण्याचा हा प्रयत्न असावा, असा टोलाही त्यांनी लगावला. भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेते पदाचे गाजर दाखवण्यात आले आहे. मात्र, ते या गटात राहतील की नाही, त्याबद्दल शंका आहे, असेही शिरसाट म्हणाले. सुषमा अंधारे यांना तर हा पक्ष आपणच स्थापन केला आहे, असे वाटत असल्याची टीकाही त्यांनी केली.
निवडणुकीची तिकिटे कोण विकणार, यासाठी भांडण
उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात सुरू असलेल्या वाताबद्दल देखील शिरसाठ यांनी भाष्य केले. हे भांडण खरे तर निवडणुकीची तिकिटे कोण विकणार, यासाठी सुरू आहे. मात्र, हा ओसाड गावच्या पाटीलकीचा वाद आहे. मी ज्येष्ठ आहे म्हणून पाटीलकी मला पाहिजे, असा खैरे यांचा दावा आहे, तर खरा पाटील मीच आहे म्हणून पाटीलकी माझ्याकडेच पाहिजे, असे दानवे यांचे म्हणणे आहे. मात्र, या सगळ्यात सर्वसामान्य शिवसैनिकांचे मरण होत आहे, असे शिरसाट यांनी सांगितले.