भाजप करणार प्रत्येक जिल्ह्यात 'जनता दरबार'चे आयोजन
पक्ष मुख्यालयात सर्व मंत्री देखील ऐकणार नागरिकांची कैफियत
मुंबई: प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार पक्षाच्या वतीने सर्व जिल्ह्यांमध्ये जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पक्षाच्या प्रदेश मुख्यालयात सर्व विभागाचे मंत्री देखील नागरिकांची कैफियत ऐकून घेण्यासाठी जनता दरबार घेणार आहेत.
जनतेचे प्रश्न जाणून त्यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी भाजपच्या वतीने सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी जनता दरबार चे आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचना चव्हाण यांनी केली आहे.
सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि सूचना थेट मंत्र्यांच्या समोर मांडण्याची संधी जनता दरबारच्या निमित्ताने नागरिकांना उपलब्ध होणार आहे. नागरिकांच्या समस्यांचा त्वरित निपटारा करण्यासाठी या उपक्रमाचा प्रभावी उपयोग होऊ शकतो, असा पक्ष संघटनेचा विश्वास आहे.
भाजपचे सर्व मंत्री देखील मुंबई येथील पक्षाच्या प्रदेश मुख्यालयात जनता दरबार चे आयोजन करणार आहेत. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या जनता दरबाराने या उपक्रमाला सुरुवात होत आहे. नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश मुख्यालयात पंकजा मुंडे यांचा दुपारी तीन ते साडेचार या वेळात जनता दरबार होणार आहे.