वक्फबाबत पुढील सुनावणीपर्यंत परिस्थिती जैसे थे
सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला बाजू मांडण्याचे आदेश
नवी दिल्ली: प्रतिनिधी
वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात दाखल याचिकांच्या पुढील सुनावणीपर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या संदर्भात पुढील सुनावणी पाच मे रोजी होणार असून तोपर्यंत केंद्राने आपली बाजू मांडावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात न्यायालयात 70 हून अधिक याचिका दाखल झाले आहेत. त्यापैकी निवडक पाच याचिकांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात कालपासून सुरू करण्यात आली आहे. काल याचिकाकर्त्यांची बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी या कायद्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. विशेषतः वक्फ परिषदेत मुस्लिमेतर सदस्यांचा समावेश करण्याबाबत त्यांनी आक्षेप घेतला.
याबाबत न्यायालयाने कायद्याला स्थगिती देऊ नये, अशी मागणी केंद्राच्या वतीने न्यायालयात करण्यात आली. न्यायालयाने ती मान्य करतानाच पुढील सुनावणी पर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याची सूचना केली. न्यायालयाचे आदेश येईपर्यंत वक्फ बोर्ड आणि परिषदेत कोणत्याही नव्या नियुक्त केल्या जाऊ नयेत, वक्फच्या मालमत्ता मध्य कोणतेही फेरबदल केले जाऊ नयेत, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.