चाकणसह छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार टेस्लाचे उत्पादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इलॉन मस्क यांच्यात सकारात्मक चर्चा
पुणे: प्रतिनिधी
टेस्लाच्या बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक कारचे कारखाने भारतात होणार असून पुण्याजवळील चाकण आणि छत्रपती संभाजी नगर येथील औद्योगिक वसाहती मध्ये या गाड्यांचे उत्पादन होणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमातून प्रसिद्ध केली आहे.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मोदी आणि मस्क यांची भेट झाली होती. त्यावेळी नावीन्यपूर्ण कल्पना, अंतराळ विज्ञान यासह टेस्लाचा भारतातील विस्तार याबद्दल चर्चा झाली होती.
भारतीय बाजारपेठेत विजेवर चालणाऱ्या वाहनांना असलेला वाव लक्षात घेता मस्क यांना भारतात विस्तार करण्याची इच्छा आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरी च उत्पादन करण्याची टेस्लाची योजना आहे. त्यासाठी टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करण्यात आली असून तिचे कार्यालय पुण्यात असणार आहे. चाकण, छत्रपती संभाजीनगर आणि गुजरातमध्ये टेस्लाचे प्रकल्प सुरू होणार आहेत.
भारतात प्रकल्प सुरू करण्यासाठी टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नोंदणी करण्यात आली आहे. भारतात उत्पादन सुरू करण्यापूर्वी कंपनीला आयात कर आणि इतर काही सवलती हव्या आहेत. त्यासाठी कंपनीकडून लवकरच केंद्र सरकारकच्या संबंधित विभागाकडे अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
भारतातील विस्तारासंबंधी इलॉन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरध्वनीवर नुकतीच चर्चा झाली आहे. ही चर्चा सकारात्मक झाली असून लवकरच टेस्लाचे प्रकल्प भारतात सुरू होतील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.