'होते त्याच जागी जैन मंदिराची उभारणी करा अन्यथा...'

तीव्र राज्यव्यापी आंदोलन करण्याचा विनोद सांकला जैन यांचा राज्य सरकारला इशारा 

'होते त्याच जागी जैन मंदिराची उभारणी करा अन्यथा...'

पुणे: प्रतिनिधी

अतिक्रमणाच्या नावाखाली मुंबई महापालिकेने जमीनदोस्त केलेले १००८ दिगंबर जैन मंदिर राज्य सरकारच्या वतीने त्याच जागेवर पुन्हा उभारण्यात यावे. अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जैन समाजाचे नेते विनोद सांकला जैन यांनी राज्य सरकारला दिला आहे. 

राज्यातील लाखो जैन भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जुने जैन मंदिर पाडण्यास जबाबदार असलेल्या महापालिका अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी देखील जैन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. 

मुंबई उच्च न्यायालयात जैन मंदिरावरील कारवाईला स्थगिती मिळावी, यासाठी दाखल असलेल्या याचिकेची सुनावणी होण्यापूर्वीच १६  एप्रिल रोजी हे मंदिर पाडण्यात आले. हा एका व्यापक कटाचा भाग असून कोणताही जैन भाविक ते सहन करणार नाही, असेही सांकला यांनी निदर्शनास आणून दिले आहे. 

हे पण वाचा  शिवसेनेच्या वतीने जळीतग्रस्त कुटुंबांना मदत

सत्यशोधन समितीने देखील मंदिर पाडण्याच्या कारवाईला सरकार जबाबदार असल्याचा ठपका ठेवला आहे. या कारवाईला जबाबदार असलेल्या प्रत्येकावर गुन्हे दाखल केले पाहिजे, असेही सांकला म्हणाले. 

आपण जैन भाविकांच्या शिष्टमंडळासह लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असून त्यांना मंदिरावरील कारवाईबाबत जाब विचारणार आहोत, असे सांगतानाच सांकला यांनी, जैन भाविकांनी उभे केलेले मंदिर पाडून सरकारला त्या जागेवर ताजमहाल उभा करायचा आहे की अन्य कोणते मंदिर, असा उपरोधिक सवालही त्यांनी केला. 

मुंबई महापालिका प्रशासनाने मंदिरावर कारवाई करण्यापूर्वी धर्मादाय आयुक्त कार्यालयाला देखील कोणतीही पूर्व सूचना दिली नाही. कारवाई करण्यापूर्वी मंदिरातील पवित्र मूर्ती, दाग दागिने आणि दानपेट्या हलवण्यास देखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अनुमती दिली नाही. त्यांचे हे कृत्य अतिशय निंदनीय आहे, अशी टीकाही सांकला यांनी केली. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालून या कारवाईची चौकशी करावी आणि या अन्याय्य कारवाईला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ही त्यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt