'वेचून वेचून बदला घेऊ, कुणालाही सोडणार नाही'
गृहमंत्री अमित शहा यांचा दहशतवादी आणि त्यांच्या पोशिंद्यांना इशारा
नवी दिल्ली: प्रतिनिधी
भारतात भ्याड दहशतवादी कारवाया करणारे अतिरेकी आणि त्यांचे पोशिंदे यांना वेचून वेचून त्यांचा बदला घेऊ. त्यांच्याकडून जाबही घेऊ. कुणालाही सोडले जाणार नाही, असा इशारा गृहमंत्री अमित शहा यांनी दिला.
येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना शहा म्हणाले की, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू करण्यात आलेली लढाई ही काही या लढ्याची सुरुवात नाही. भारताने 90 च्या दशकापासूनच दहशतवादाबाबत 'शून्य सहिष्णुता' (झिरो टॉलरन्स) हे धोरण अवलंबले आहे.
जर कोणी भेकडासारख्या कारवाया करून आपण जिंकलो, असे समजत असेल, तर त्यांना मी सांगू इच्छितो की कोणालाही सोडले जाणार नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातील दहशतवाद ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत देशातील दहशतवाद संपत नाही, तोपर्यंत त्याच्या विरोधातील लढा सुरूच राहील, असा इशारा शहा यांनी दिला.
दहशतवादाच्या विरोधातील या लढ्यात केवळ भारताचे 140 कोटी नागरिक सहभागी आहेत असे नाही तर संपूर्ण विश्व भारताच्या पाठीशी आहे. दहशतवाद विरोधातील या लढ्यात सर्व देश भारतीय नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत. दहशतवादाचे समोर उच्चाटन करणे हा आमचा संकल्प असून तो निश्चितपणे पूर्ण केला जाईल, असा दावाही शहा यांनी केला.