पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर लाखो सायबर हल्ले
महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाचा दावा
मुंबई: प्रतिनिधी
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतावर होणाऱ्या सायबर हल्ल्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या घटनेनंतर भारतावर तब्बल १० लाख सायबर हल्ले झाल्याचा दावा महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाकडून करण्यात आला आहे.
दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील विविध संकेतस्थळांवर हल्ले करून ती निकामी करण्याचे किंवा माहितीत फेरफार करण्याचे १० लाख प्रकार उघडकीला आल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस सायबर सेलचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव यांनी दिली आहे. हे हल्ले पाकिस्तान, मध्य पूर्वेतील देश, इंडोनेशिया आणि मोरोक्को या देशांमधून झाले असून त्यापैकी बहुतेक हल्ले यशस्वीपणे परतवून लावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विभागाने राज्य शासनाच्या सर्व विभागांसाठी मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत. त्यात प्रामुख्याने सर्व विभागांनी आपली संकेतस्थळे सुरक्षेच्या दृष्टीने सक्षम आणि अद्ययावत करण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही यादव यांनी सांगितले.
पहलगाम येथे बैसरन व्हॅलीत आलेल्या पर्यटकांचे दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म विचारून बळी घेतले. या हल्ल्यात २७ पर्यटक आणि त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणारा एक स्थानिक खेचरवाला यांचा मृत्यू झाला.