'आता सर्जिकल स्ट्राइक नको तर थेट सर्जरीच हवी'

पाकिस्तानवरील कारवाईबाबत छगन भुजबळ यांचे स्पष्ट मत

'आता सर्जिकल स्ट्राइक नको तर थेट सर्जरीच हवी'

मुंबई: प्रतिनिधी

दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानवर आता सर्जिकल स्ट्राइक वगैरे नव्हे तर थेट सर्जरीच करण्याची आवश्यकता आहे, असे स्पष्ट मत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. 

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला करून 27 जणांचा बळी घेतला. या प्रकारामुळे देशभरात संतापाची लाट असून भारत सरकार पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवण्याच्या विचारात आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. 

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आठवणींना उजाळा 

हे पण वाचा  'पीएसआय अर्जुन'च्या गाण्याला 'पुष्पा फेम' नकाश अजीज यांचा आवाज

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने छगन भुजबळ यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीतील आपल्या आठवणींना देखील उजाळा दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली छगन भुजबळ यांचा या चळवळीत सक्रिय सहभाग होता. 

दीर्घकाळ संघर्ष केल्यानंतर हा महाराष्ट्र आपल्याला प्राप्त झाला आहे. त्यासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचनेचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी मराठी भाषिकांच्या वाट्याला कोणतेही राज्य नव्हते. त्यामुळे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, आर डी भंडारे यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्रासाठी चळवळ सुरू केली. पुढे तिने व्यापक स्वरूप धारण केले, असे भुजबळ यांनी सांगितले. 

जोपर्यंत काँग्रेसकडे राज्य आहे तोपर्यंत संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती केली जाणार नाही, अशी दर्पोक्ती स का पाटील आणि मोरारजीभाई देसाई यांनी केली होती. महाराष्ट्रासाठी आंदोलन करणाऱ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश मोरारजीभाई देसाई यांनी दिले.  त्यात 106 जणांनी हौतात्म्य पत्करले. प्रबोधनकार ठाकरे, शाहीर अमर साबळे आणि खुद्द सेनापती बापट यांच्यासारख्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. प्रतापगडावर आलेल्या तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना आम्ही काळे झेडे दाखवले. मोठ्या संघर्षातून या महाराष्ट्राची उभारणी झाली आहे, अशा आठवणी भुजबळ यांनी जागविल्या. 

...तरी पुरोगामी विचार सोडला नाही

आपला पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत असला तरी देखील आम्ही पुरोगामी विचार सोडलेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्याच पुरोगामी विचाराच्या मार्गाने पुढे जात आहोत, असा दावा देखील भुजबळ यांनी केला. जातीनिहाय जनगणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत देखील त्यांनी समाधान व्यक्त केले. 

About The Author

Advertisement

Latest News

Advt