राज्यात या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता
अनेक ठिकाणी ढगफुटी आणि अतिवृष्टीचा इशारा
पुणे: प्रतिनिधी
राज्यात मॉन्सूनच्या मोसमात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच १०५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश पर्जन्यमानाच्या शक्यतेमुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. यावर्षी राज्यात पावसाचे आगमन नेहमीपेक्षा लवकरच होण्याची शक्यता ह वर्तवली गेली आहे.
यावर्षी नैऋत्य मान्सून जून ते सप्टेंबर या कालावधीत कार्यरत राहणार असून महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात पर्जन्यमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत राज्याच्या काही भागात अतिवृष्टी आणि ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण होण्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
मॉन्सूनची प्रतीक्षा असतानाच देशात व राज्यातही अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. पुढील चार दिवस हा पाऊस सुरू राहण्याची शक्यता असून विशेषतः 21 व 22 तारखेला सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई, गोवा आणि कोकण या विभागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर या जिल्ह्यांनाही पुढील चार दिवसांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात मराठवाड्यातील ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.