समुपदेशन करून होत आहेत शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या
पंकजा मुंडे यांनी सांगितली बदल्यांची नवी पद्धत
मुंबई: प्रतिनिधी
शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या हा नेहमीच वादग्रस्त विषय राहिला आहे. बदल्यांच्या प्रक्रियेतील अनियमितता आणि मनमानी टाळण्यासाठी सध्या शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या समुपदेशन करून ऑनलाइन पद्धतीने केल्या जात असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी आनंदाने आणि समाधानाने काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याची तक्रार नेहमीच केली जात असते. मात्र बदल्यांची ही प्रक्रिया परिणामकारक आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने पावले उचलली आहेत. या पूर्वी किमान 20 ते 30 टक्के बदल्या वादग्रस्त ठरत असत. आता मात्र अधिकाऱ्यांचे मत देखील जाणून घेण्याच्या दृष्टीने बदली करताना त्यांचे समुपदेशन केले जात आहे. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जात आहेत. आजारी असलेले अधिकारी, विधवा अधिकारी यांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी बदली मिळण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्याचप्रमाणे पती-पत्नी अधिकारी असल्यास त्यांना एकाच ठिकाणी नेमणूक देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे मुंडे यांनी सांगितले.
ओबीसींवर होणार नाही अन्याय
महापालिका निवडणुकीत इतर मागासवर्गीयांवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही देखील पंकजा मुंडे यांनी दिली. महापालिका आणि एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या की महायुती म्हणून लढवायच्या हे निवडणुका जाहीर झाल्यावर ठरवण्यात येईल. सध्या आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत, असेही मुंडे यांनी सांगितले.