छगन भुजबळ यांचे मंत्रिमंडळात 'पुनर्वसन'
अन्न व नागरी पुरवठा विभागाची मिळणार जबाबदारी
मुंबई: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दीर्घकाळ उपेक्षित राहिलेले जेष्ठ नेते छगन भुजबळ यांचे राज्याच्या मंत्रिमंडळात पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.
विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार प्रचंड बहुमताने सत्तेवर येऊन देखील भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी जाहीर होण्यास झालेला विलंब आणि विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळातून डावलले जाणे यामुळे भुजबळ दीर्घकाळ नाराज होते. अखेर त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा देण्यात आला. त्यांच्या जागेवर भुजबळ यांना स्थान मिळाले आहे. त्यांच्यावर अन्न व नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. या विभागाचे सूत्र तिसऱ्यांदा त्यांच्याकडे आली आहेत.
भुजबळ हे जसे राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत तसेच ते इतर मागावर्गीयांचे मोठे नेते आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांना नाराज ठेवणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि महायुतीला परवडणारे नाही. त्यामुळे भुजबळ यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.