'... तसा कोणता प्रस्ताव नाही आणि चर्चाही नाही'
दोन्ही राष्ट्रवादीl एकत्र येण्याच्या चर्चेवर तटकरे यांची स्पष्टोक्ती
अलिबाग: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांना सध्या जोर आला आहे. मात्र, आत्ता तरी अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव पक्षासमोर आलेला नाही किंवा पक्षनेतृत्वाच्या पातळीवर अशी कोणती चर्चाही सुरू नाही. त्यामुळे सध्या तरी हा प्रश्नच उद्भवत नाही, अशी स्पष्टोक्ती प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर राजकीय वर्तुळात त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विशेषत: महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
एकत्रिकरणाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी शरद पवार यांची भेट घेतली. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार सचिन आहिर यांनी देखील पवार यांची भेट घेतली.
दुसरीकडे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील शरद पवार अजूनही राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आले तर त्यांचे स्वागतच आहे, असे विधान केले आहे. यापूर्वीच पवार आमच्याबरोबर आले असते तर राष्ट्रपती झाले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खांद्याला खांदा लाऊन देशाच्या भल्यासाठी काम करू शकले असते, असेही आठवले म्हणाले.