" मी भारतीय " मोफत पहा – मुंबई मराठी पत्रकार संघात !
मुंबई / रमेश औताडे
" मी भारतीय " हा फक्त एक दीर्घांक नाही तर दीर्घकाळ लक्षात राहणारा स्वातंत्र्य लढ्याच्या उजळणीचा प्रयत्न आहे. राष्ट्राला स्वातंत्र्य मिळालं, पण त्यासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करलं, अतोनात कष्ट करून आपलं आयुष्य राष्ट्रासाठी समर्पित केलं. पण सध्या स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार असाच ग्रह करून जगणाऱ्या पिढी समोर हा इतिहास मांडण्याचा 'भी भारतीय' हा प्रयत्न आहे. म्हणूनच आम्ही म्हणतो, 'मी भारतीय' ही एक चळवळ आहे. या चळवळीत प्रेक्षकांच्या भूमिकेत राहून राष्ट्रकर्यात सहभागी व्हावे असे आवाहन रंगकर्मी रविंद्र देवधर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे केले.
तरुण पिढीपर्यंत राष्ट्रभावनेचा विचार जास्तीत जास्त पोहोचावा या साठी १५ ऑगस्ट २०२१ रोजी मालवणमध्ये आपल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पहिल्या दिवशी याचा पहिला प्रयोग सादर केला. त्यानंतर महाराष्ट्रात ९० पेक्षा जास्त शाळांमध्ये, विविध संस्थांमध्ये आणि इतर मान्यवर मंचांवर आतापर्यंत याचे १९९ प्रयोग सादर केले. अनेक मान्यवरांनी आणि हजारो विद्यार्थ्यांनी नावाजलेला असा हा प्रयोग २०७ पूर्ण करून पुढील राष्ट्र कार्यासाठी कार्यरत आहे.
मानवी रूपात अवतरलेलं आपल्या राष्ट्राचे स्वातंत्र्य आणि एक विदेशात राहणारा भारतीय तरुण यांच्यातील संवाद म्हणजेच " मी भारतीय " आहे. स्वातंत्र्य नावाचे पात्र मनुष्य रूपात एका जंगलात बसलं आहे. विदेशात राहणारा एक भारतीय तरूण तिथे येतो. तो आपल्या मित्रांबरोबर ट्रेकिंगला आलेला असून वाट चुकून तिथे येतो. जेव्हा तो तरूण देशाबद्दल वाईट बोलायला लागतो तेव्हा स्वातंत्र्य त्याला स्वातंत्र्य लढा म्हणजे काय, त्याचं महत्व काय, झाशीच्या राणीचं महत्व, सावरकरांनी काय केलं, टिळक, चाफेकर बंधू , मौलाना अबुल कलाम, आझाद बाबू गेनू , महात्मा गांधी , पंडित नेहरू यांनी काय केलं, इंग्रजांच्या गुलामीतून देशाला सोडवण्यासाठी कित्येक क्रांतिकारकांनी पत्करलेलं हौतात्म्य त्याचं महत्व सांगत, रँडला का मारलं, जालियनवाला बाग इथे काय झालं, डायरला का मारलं, इंग्रजांनी नक्की काय केलं या संवादातून नाटक पुढे जाते.
स्वातंत्र्य नावाचे पात्र त्याच्या तरुण पिढी कडून असलेल्या अपेक्षा शेवटी सांगतं. आणि नंतर तो तरूण आपल्या कॅनडा मधल्या नोकरीचा राजीनामा मेल करून; स्वातंत्र्याचे विचार सगळ्या भारतात पोहोचवण्याचा ठाम निर्धार व्यक्त करतो.शेवटी प्रतिज्ञा होते आणि राष्ट्रगीत झाल्यावर प्रयोग संपतो. हा द्विपात्री दीर्घाक १ तासाचा आहे. सर्वांसाठी मोफत आहे. प्रेक्षकांनी दीर्घाक पाहून झाल्यावर भिक्षा पात्रात स्वेच्छा दान द्यावे व राष्ट्र कार्यात सहभागी व्हावे.
मुंबई मराठी पत्रकार संघाने प्रत्येक शुक्रवारी या दीर्घांगाच्या राष्ट्र कार्यासाठी सभागृह व इतर सोयी सुविधा मोफत देण्याचे सहकार्य केले असल्याने रविंद्र देवधर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांचे आभार मानले आहेत. नाट्य शुक्रवार नावाने सुरू झालेला मुंबई मराठी पत्रकार संघाचा उपक्रम दर चौथ्या शुक्रवारी मुंबई मराठी पत्राचा संघाच्या वास्तूमध्येच सर्वांना मोफत पाहता येईल.
000