पुण्याला गतलौकिक प्राप्त करून देणार अमितेश कुमार?
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कसून प्रयत्न
पुणे: प्रतिनिधी
ऐतिहासिक काळापासून पुणे शहराला महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात विशेष स्थान आहे. एकेकाळी दिल्लीच्या तख्ताचा कारभार पुण्यातून चालवला जात होता. स्वातंत्र्यासाठीच्या राष्ट्रीय लढ्याला याच शहराने नेतृत्व दिले. सनदशीर मार्गापासून क्रांतिकारी लढ्यापर्यंत चळवळींना पुण्याने नेतृत्व दिले. देशाची सांस्कृतिक राजधानी हा पुण्याचा लौकिक! विद्येचे माहेरघर ही पुण्याची ख्याती! एकेकाळी हे पेन्शनर लोकांचे शहर होते. मात्र, बदलत्या काळानुसार शहराचा सामाजिक, आर्थिक पोत बदलत गेला आणि भौतिक प्रगतीबरोबर शहरातील शांतता आणि सुव्यवस्था ढासळत गेली.
बदलत्या काळात पुणे हे कॉस्मोपॉलिटिन बनले. उद्योगधंदे वाढले. शहराचा उभा, आडवा आकार आणि लोकसंख्या वाढत गेली. त्याचबरोबर शहरातील गुन्हेगारी देखील वाढत गेली. सध्याच्या काळात तर पुणे ही गुन्हेगारीची राजधानी होऊ पहात आहे. खून, बलात्काराचे गुन्हे, चोऱ्या,माऱ्या आणि संघटीत गुन्हेगारी वाढत गेली. पांढरपेशी आर्थिक गुन्हेगारी, सायबर गुन्हेगारी अशा गुन्ह्यांची त्यात भर पडली.
हातभट्टीची बेकायदेशीर विक्री, मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्री, अमली पदार्थांची विक्री अशा अनेक प्रकारच्या गुन्हेगारीचे अड्डे शहरात, विशेषत: उपनगरात चालू आहेत. काही काळापूर्वी शहरातील मटका धंदे पूर्णपणे बंद झाल्याचा दावा केला गेला. प्रत्यक्षात अजून पुणे आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात चार ते पाच ठिकाणी मटका धंदे सुरू आहेत. विशेषत: शिवाजीनगर आणि हडपसर पोलीस ठाण्याची हद्द गुन्हेगारीत आघाडीवर आहे. पोलीस अधिकारी आणि गैरधंदे करणारे गुन्हेगार यांच्या 'अर्थपूर्ण' युतीमुळे हे धंदे सर्रास सुरू आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हप्तेवसुली करणाऱ्या दलालांची यादी पहा पुढच्या अंकात...
या सगळ्या नकारात्मक पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी एकमेव आशेचा किरण म्हणजे पोलीस आयुक्त अखिलेश कुमार! अखिलेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्त पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर शहरातील गुन्हेगारीचे आणि कायदा सुव्यवस्था स्थितीचे सविस्तर विश्लेषण केले. त्यानंतर आपले कौशल्य आणि अनुभव पणाला लावून शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रभावीपणे पावले उचलण्यास सुरुवात केली. त्याचे परिणाम दीर्घकालीन असून ते काही प्रमाणात का होईना दिसून यायला सुरुवात झाली आहे.
अमितेश कुमार यांनी सर्वप्रथम लक्ष केंद्रित केले ते शहरातील संघटित गुन्हेगारीकडे! जमिनीचे व्यवहार, खंडणीखोरी या माध्यमातून शहरात फोफावलेल्या संघटीत गुन्हेगारांना त्यांनी चांगलाच चाप लावला. शहरातील सर्वच नामचीन गुंडांना अमितेश कुमार यांनी आयुक्तालयात आणून एका रांगेत हात बांधून उभे केले. त्यापुढे शहरात दहशत वाजवण्याचे प्रयत्न केले तर गय केली जाणार नाही, अशी समज त्यांना कडक शब्दात दिली गेली. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासात अशी घटना प्रथमच घडली. उपलब्ध आकडेवारीनुसार सध्या पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात संघटित गुन्हेगारीमध्ये 17 टक्क्याने घट झाली आहे.
पुणे शहरात गुन्हेगारीचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या आणि त्यावर राज्य करणाऱ्या गजा मारणेसारख्या गुंडाला वठणीवर आणण्याचे काम अमितेश कुमार यांनी केले. त्याच्याबरोबर मटन पार्टी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धडा शिकवून त्यांनी पोलीस दलाला एक कडवा संदेशही दिला.
शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागरिक आणि पोलीस यांच्या सुसंवाद असणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन अमितेश कुमार यांनी पुढाकार घेतला. समाजातील विविध घटकांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. पोलिसांकडून समाजाच्या काय अपेक्षा आहेत हे त्यांनी जाणून घेतले. त्याचप्रमाणे समाजाकडून पोलिसांना कोणते सहकार्य अपेक्षित आहे, हे देखील त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे निश्चितपणे पोलीस आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये सहकार्याचा पूल निर्माण होण्यास मदत झाली आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीस आणि नागरिक यांच्यात सुसंवाद वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार नागरिकांना पोलीस चौकी किंवा ठाण्याची पायरी न करता ऑनलाइन तक्रारी दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याच्याही पुढे पाऊल टाकून अमितेश कुमार यांनी नागरिक आणि पोलीस यांच्यात दुवा साधणारी अनेक मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
स्वारगेटवरील बलात्कार प्रकरणासह अन्य काही प्रकरणांमुळे महिलांवरील अत्याचारांबद्दल पुणेकरांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात उपलब्ध आकडेवारीनुसार महिलांवरील अत्याचारांमध्ये अल्प प्रमाणात का होईना पण घट झाल्याचे दिसून येते. याशिवाय गुन्हे नोंदविण्याचे प्रमाण वाढले असून गुन्ह्यांचा तपास करून गुन्हेगारांना शिक्षा करण्याच्या प्रमाणात देखील वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरोड्यांच्या प्रमाणात देखील घट झाल्याचे आकडेवारी दाखवते. मात्र, चोऱ्या, पाकीटमारी, साखळी चोरी अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढ झाली आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी रस्त्यावरील गस्त वाढवण्यासह अन्य उपाययोजना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या विचाराधीन आहे. याशिवाय पुणे शहरातील सर्वाधिक त्रासदायक समस्या वाहतुकीशी संबंधित आहे. पुणे पोलीस आयुक्तालय आणि पुणे महापालिका या संस्था संगमने यावर मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहेत. थोडक्यात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कारकिर्दीत कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत पुणे शहराची ढासळलेली परिस्थिती पूर्ववत होईल आणि पुणे शहराचा शांत आणि सुरक्षित शहर हा नावलौकिक कायम राहील, अशी अपेक्षा पुणेकर करीत आहेत.