'तिसऱ्या डोळ्याने' हगवणे पिता पुत्र झाले जेरबंद
हॉटेलमधील सीसी टीव्ही कॅमेऱ्याने उलगडले रहस्य
पुणे: प्रतिनिधी
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर तब्बल आठवडाभर फरार असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि वैष्णवी यांचे सासरे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील यांना हॉटेलमध्ये तैनात असलेल्या तिसऱ्या डोळ्याने अर्थात सीसीटीव्ही कॅमेऱ्याने अचूक टिपले आणि हे पिता पुत्र जेरबंद झाले.
वैष्णवी हगवणे यांनी आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. हुंड्यासाठी छळ होत असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांचे वडील आनंद कस्पटे यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून वैष्णवी यांचे पती शशांक यांच्यासह सासू आणि नणंद यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून सासरे राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे हे फरार होते. पिंपरी चिंचवड पोलिसांची विशेष पथके त्यांचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली होती.
पिंपरी चिंचवड जवळच तळेगाव येथे एका हॉटेलमध्ये जेवण करत असताना राजेंद्र हगवणे यांची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपली. त्याचप्रमाणे हॉटेल बाहेरच्या कॅमेऱ्याने सुशील हे काही अंतरावर चालत गेल्याचे दृश्य उघड केले. यामुळे राजेंद्र आणि सुशील हगवणे यांचा पोलिसांना सुगावा लागला. पोलिसांनी या परिसराची नाकाबंदी करून या दोघा पिता-पुत्रांना अटक केली.