मॉस्कोच्या विमानतळावर युक्रेनचा ड्रोनहल्ला
भारतीय खासदारांचे विमान हवेतच खोळंबले
मॉस्को: वृत्तसंस्था
गुरुवारी रात्री युक्रेंनने रशियाच्या मॉस्को येथील विमानतळावर ड्रोन द्वारे हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे विमानतळ काही काळापुरते बंद करण्यात आले. नेमके याचवेळी भारतीय खासदारांचे पथक असलेले विमान विमानतळावर उतरण्याच्या भेतात होते. मात्र, या हल्ल्यामुळे खासदारांचे हे विमान 40 मिनिटे हवेतच घिरट्या घेत राहिले.
ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड करण्यासाठी भारतीय खासदारांची विविध पथके वेगवेगळ्या देशांना रवाना होत आहेत. याचाच एक भाग म्हणून द्रविड मुन्नेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी यांच्या नेतृत्वाखाली खासदारांचे पथक मॉस्कोला भेट देण्यासाठी रवाना करण्यात आले.
या पथकाला घेऊन जाणारे विमान मॉस्को विमानतळावर उतरत असताना युक्रेनकडून ड्रोनचा हल्ला झाला. त्यामुळे विमानतळ बंद करण्यात आले. तब्बल 40 मिनिटं ड्रोन हल्ल्याचा हा थरार सुरू होता. त्यानंतर मात्र मॉस्को विमानतळ प्रशासनाने खासदारांच्या विमानाला खाली उतरण्याचा संदेश पाठविला आणि या पथकातील सर्व खासदार सुरक्षितपणे मॉस्को येथे पोहोचले. मॉस्को येथील भारतीय राजदूत विनय कुमार यांनी या पथकाचे स्वागत केले.