'बोलाचाच राजीनामा, बोलाचेच पत्र'

नाराजीचे वृत्त माध्यमे पसरवीत असल्याचा पटोले यांचा आरोप 

'बोलाचाच राजीनामा, बोलाचेच पत्र'

नाशिक विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसचे आजी माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला असला तरी थोरात यांनी आपल्या पक्षनेते पदाचा राजीनामा दिलेला नाही किंवा आपल्याबद्दल तक्रार करणारे पत्रही दिले नाही, असा दावा पटोले यांनी केला आहे. या वादाची वृत्त माध्यमे पसरवीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

पुणे: प्रतिनिधी 

नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यावरून माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील वादाला तोंड फुटले. त्यानंतर थोरात यांनी पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करणारे पत्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठविले. तरीही वाद मिटण्याची चिन्ह दिसत नसल्यामुळे त्यांनी आपल्या पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर केंद्रीय नेत्यांनी हस्तक्षेप करून बाळासाहेब थोरात यांना त्या पदावर कार्यरत राहण्याचे आदेश दिले. 
 
मात्र, प्रत्यक्षात थोरात यांनी आपल्याबद्दल नाराजी व्यक्त करणारे पत्र पक्षाध्यक्षांना दिलेच नाही किंवा पक्षनेते पदाचा राजीनामाही दिला नाही, असा दावा पटोले यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. कुठे आहे ते पत्र आणि कुठे आहे तो राजीनामा? कोणत्या वृत्तपत्राने ते छापले आहे किंवा वाहिनीने ते दाखवले आहे ते दाखवा, असे आव्हानच पटोले यांनी दिले आहे.
 
प्रदेश काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य असल्याची वृत्त माध्यमे अधिक पसरवीत आहेत. काही प्रमाणात कुरबुरी असतील तर त्या एकत्र बसून चर्चेद्वारे दूर करता येतील, असेही पटोले यांनी म्हटले आहे. 

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us