मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, राज्य आणि केंद्र एकत्र आल्याने चांगली कामे उभी रहात आहेत. रेल्वे मार्ग ओलांडण्याच्या ठिकाणी फाटक नसले की नागरिकांच्या जीवाला धोका असतो. म्हणून असे प्रकल्प लवकर पूर्ण करून जनतेचा त्रास दूर करण्याचे प्रयत्न आहे. राज्यात रेल्वेसंबंधी प्रकल्प जलदगतीने पूर्ण व्हावेत म्हणून राज्य शासनाने महारेलची स्थापना केली. महारेलतर्फे वेगाने कामे करण्यात येत आहेत. राज्यात 9 उड्डाणपूलांचे लोकार्पण आणि 11 उड्डाणपूलांचे भूमिपूजन प्रथमच होत आहे. उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाच्या कामांमुळे जनतेचा वेळ वाचणार आहे.
दरवर्षी 11 उड्डाणपूल याप्रमाणे 16 हजार कोटींची कामे करणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यावेळी श्री.गडकरी म्हणाले, सेतू बंधन योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या 11 उड्डाणपूलांसाठी 100 टक्के निधी भारत सरकारने मंजूर केला आहे. महाराष्ट्र प्रगतीशील आणि संपन्न राज्य आहे. राज्यात नागरिकांच्या सुरक्षेसाठी रेल्वे फाटकांचे रुपांतर उड्डाणपुलात करणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन आणि रेल्वेने मिळून 9 उ्डाणपूल पूर्ण केले आणि 11 पूलांचे भूमिपूजन होत आहे. दरवर्षी 11 पूल याप्रमाणे 16 हजार कोटींची ही कामे करण्यात येणार आहेत. येत्या काळात फाटकमुक्तीसाठी उ्डाणपूल बांधून जनतेला चांगली सुरक्षा देण्यात येईल.
पालखी मार्गाचे काम राज्याच्या वैभवात भर घालणारे होईल
महाराष्ट्राची सर्व क्षेत्रात चांगली प्रगती होत आहे. महामार्ग आणि रस्त्यांची कामे वेगाने होत आहे. पुण्यात पालखी मार्गाचे काम वेगाने होत आहे. पालखी तळाच्या विकासाची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी चांगला आराखडा करून ही कामे पूर्ण करण्यात येतील. पालखी मार्गाचे काम लवकरच पूर्ण होईल आणि महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे हे काम होईल.
’महारेल’ गुणवत्तापूर्ण काम करेल
‘महारेल’ने रेल्वेचे नियम लक्षात घेऊन चांगले काम केले आहे. योजनेअंतर्गत एकूण 91 पूल उभारण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 25 आणि दुसऱ्या टप्प्यात 66 पूल प्रस्तावित आहेत. यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचना महारेलला देण्यात आल्या असून त्यांच्याकडेच ही जबाबदारी देण्यात येणार आहे. महारेल गुणवत्तापूर्ण कामे करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रेल्वेच्या कामासाठी महाराष्ट्र सरकारने रेल्वेसह स्थापन केलेल्या महारेलने चांगले काम केले आहे. या सर्व प्रकल्पात रेल्वेच्या नियमांचे पालन करतानाच वेळेत काम पूर्ण करण्यात आले आहे, असे सांगून त्यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
440 कोटी रुपयांच्या 9 उड्डाणपुलांचे लोकार्पण
महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे उभारण्यात आलेल्या 440 कोटी रुपयांच्या राज्यातील 9 उड्डाणपुलांचे लोकार्पण करण्यात आले. यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे मंत्रालयाच्या यांच्या भागीतदारीतून उभारण्यात आलेल्या 8 पुलांचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तर केंद्रीय रस्ते निधीतून सेतूबंधन योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या एका पुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याहस्ते करण्यात आले.