'देशातील तरुण पिढी नासविण्याचे काम गुजरात मधून सुरू'
अमली पदार्थांच्या व्यापारावरून राऊत यांनी साधला मोदी यांच्यावर निशाणा
मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला नेण्याबरोबरच जगभरातील अमली पदार्थांचा व्यापार गुजरात मध्ये एकवटला आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य करावे आणि अमली पदार्थाच्या सेवनामुळे नासाविला जाणाऱ्या तरुण पिढीला कसे वाचवावे याबाबत देशाला मार्गदर्शन करावे, अशी खोचक टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
मागील काही काळापासून गुजरातमध्ये कोट्यावधी रुपयांचे अमली पदार्थांचे व्यापार होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार यांच्या कार्यकाळात गुजरातला 'उडता गुजरात' बनवण्यात आले आहे. गुजरातमधून अमली पदार्थांचे लोण महाराष्ट्रातही आले असून मुंबई, पुणे, नाशिक या शहरांमध्ये अमली पदार्थाचा सुळसुळाट झाला आहे, अशी टीका करतानाच, सत्ताधाऱ्यांना गुजरातप्रमाणे महाराष्ट्रालाही 'उडता महाराष्ट्र' करायचे आहे का, असा संतप्त सवालही राऊत यांनी केला.
पंतप्रधानांनी खोटे बोलू नये
सामान्यपणे देशाच्या पंतप्रधानांनी खोटे बोलू नये, अशी अपेक्षा असते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्रास खोटे बोलत आहेत. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या बदली काहीच न पडल्याची टीका त्यांनी विदर्भात बोलताना केली. मात्र, यापूर्वी याच मोदी यांनी तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांच्या कार्याचा गौरव केला होता. आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना कृषी आणि सहकाराच्या बाबतीत पवार यांच्याकडून आपल्याला पूर्ण सहकार्य मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले होते. इतकेच नव्हे तर, पवार आपले राजकीय गुरु असून त्यांचे बोट धरूनच आपण राजकारणात आलो असेही ते म्हणाले होते, याची आठवण राऊत यांनी करून दिली.
मुंबईतील आदर्श सोसायटीचा घोटाळा हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी केला आहे. या सर्वात मोठ्या घोटाळ्याचे सूत्रधार असलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपामध्ये घेण्यात आले. काँग्रेसमधून भाजपात येताच त्यांना राज्यसभेची खासदारकीही प्रदान करण्यात आली.
महाराष्ट्रातील सिंचन घोटाळ्याला जबाबदार असणाऱ्यांना आपण कदापि सोडणार नाही, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले होते. मात्र, याच घोटाळ्याचा प्रमुख आरोप असलेले अजित पवार यांना भाजपाने आपल्या गोटात सामील करून घेतले. त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपदही दिले. मोदी आणि भाजप यांच्या या खोटेपणामुळे त्यांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला मोदी यांच्या शब्दावर विश्वास उरलेला नाही, अशी टीकाही राऊत यांनी केली.