'स्टॉर्म वॉटर लाईन'ला रेनवॉटर हार्वेस्टिंगची जोड द्या'
पाणी तुंबण्याची समस्या टाळण्यासाठी आबा बागुल यांची प्रशासनाला सूचना
पुणे: प्रतिनिधी
यंदाही पहिल्याच पावसात पुणे शहरच काय उपनगरेही 'पाण्यात' गेली. तास - दोन तासांच्या पावसाने दाणादाण उडवून दिली शिवाय निद्रिस्त प्रशासन आणि सुस्त लोकप्रतिनिधी याचा पर्दाफाश पुन्हा एकदा झाला. दरवर्षी कोट्यवधी रुपये नालेसफाईवर खर्च करूनही दरवर्षी पावसाळ्यात शहराचे विविध भाग जलमय आणि वाहतुकीची कोंडी हे चित्र पुणेकरांसाठी चिंताजनक आहे. त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून पाच वर्षांपूर्वी दिलेल्या पावसाळी वाहिनीला रेनवॉटर हार्वेस्टिंगची जोड देऊन त्यासाठी स्वतंत्र 'सोक पिट'तयार करण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करा आणि पुणेकरांना दिलासा द्या, अशी मागणी माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा बागुल यांनी केली आहे.
यासंदर्भात माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले की, गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण वाढत आहे. पहिल्याच पावसात रस्ते जलमय, घरांमध्ये पाणी शिरण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे दरवर्षी परिस्थिती चिंताजनक बनत आहे. त्यामुळे कोट्यवधींचा निधी दरवर्षी खर्च करूनही नालेसफाई सक्षमपणे होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. मुळात 'स्टॉर्म वॉटर लाईन'मध्ये कचरा अडकल्याने पावसाचे पाणी नदीत वाहून जाण्यास अडथळा ठरत असल्याने शहराचे विविध भाग जलमय होत असल्याची वस्तुस्थिती आहे. संपूर्ण शहरात आपण सिमेंट क्रॉंक्रीटचे रस्ते साकारले आहेत आणि फुटपाथही सिमेंट ब्लॉकचे आहे मग पावसाळयात पावसाचे पाणी जमिनीत मुरणार कसे, याचाही विचार पालिका प्रशासनाने केलेला नाही. त्यामुळे पाणी जमिनीत मुरून भूगर्भातील पाणीसाठा वाढण्यालाही बाधा निर्माण झाली आहे आणि पावसाचे पाणी थेट नाल्यातून वाहून रस्त्यांवर येत आहे. पावसाळी वाहिनीमधून हे पाणी नदी - नाल्यात जाण्यासही अडथळा निर्माण झालेला आहे. त्यामुळेच पाच वर्षांपूर्वी पावसाळी वाहिनीला रेनवॉटर हार्वेस्टिंगची जोड देऊन त्यासाठी स्वतंत्र 'पिट' तयार करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्याचा आराखडाही तयार केलेला आहे. जिथे पावसाळी पाणी वाहून नेणारी वाहिनी आहे. तिथे ठिकठिकाणी कूपनलिका घेऊन स्वतंत्र पिटद्वारे संरक्षित जाळीतून पावसाचे पाणी स्वच्छ होऊन भूगर्भात मुरविणे. जेणेकरून भूजल पातळीही वाढेल असा हा प्रस्ताव होता.
मात्र प्रशासनासह राजकीय अनास्थेमुळे हा प्रस्ताव आजही प्रलंबित आहे. वास्तविक दरवर्षी नालेसफाईवर ५० कोटी रुपयांचा निधी खर्च होतो मात्र या प्रस्तावानुसार कूपनलिका घेणे आणि संरक्षित जाळी संरचना असलेले 'सोक पिट'च्या माध्यमातून पावसाचे पाणी भूगर्भात जिरविण्यासाठी त्या तुलनेत खूपच कमी खर्च आहे. त्यात ही उपाययोजना कायमस्वरूपी असणार असून पावसाळयात कुठेही पाणी साठणार नाही, रस्ते जलमय होणार नाहीत याकडेही आबा बागुल यांनी लक्ष वेधले आहे.