महायुती सरकारमध्ये नाराजीनाट्य?
अजितदादा मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याची चर्चा
मुंबई: प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली असून त्यामुळे सत्ताधारी महायुतीमध्ये सत्ता ग्रहण केल्यावर अल्पावधीत नाराजीनाट्य सुरू झाले असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या मंत्री व आमदारांच्या बैठकीत अजितदादांनी मुख्यमंत्र्यांबद्दल नाराजी स्पष्ट शब्दात व्यक्त केल्याचे पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी नमूद केले.
विधानसभा निवडणुकीत महायुतीने घटक पक्षांमध्ये योग्य समन्वय साधून अपेक्षेपेक्षा अधिक मोठा विजय प्राप्त केला. मात्र, सत्ता हस्तगत केल्यानंतर महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भारतीय जनता मित्र पक्षांवर, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मंत्री आणि आमदारांच्या बैठकीत खुद्द अजितदादांनी या भावनेला मोकळी वाट करून दिली, अशी माहिती मिळत आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळातील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निर्णयांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी परस्पर स्थगिती दिली. अशाप्रकारे परस्पर स्थगिती देणे अयोग्य असून फडणवीस यांनी आपल्याशी चर्चा करून या निर्णयांचा नेमका काय विपरीत परिणाम होऊ शकतो, याबद्दल आपल्याला माहिती देणे अपेक्षित होते, अशी भावना अजित दादांनी आपल्या पक्षाच्या मंत्री आणि आमदारांसमोर व्यक्त केल्याचे समजते.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला देखील भाजप अजित पवार यांच्यावर कुरघोडी करण्याचे साधन म्हणून पाहत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना केला होता. हे प्रकरण 'हायजॅक' करून आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून विरोधी पक्ष आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे भरून काढून पहात असलेली पोकळी व्यापण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा त्यांचा आरोप आहे.