मस्साजोगचे गावकरी करणार अन्नत्याग आंदोलन
पोलीस हेच खरे गुन्हेगार असल्याचा आरोप
बीड: प्रतिनिधी
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी पोलीस हेच खरे गुन्हेगार असल्याचा आरोप मस्साजोगच्या गावकऱ्यांनी केला आहे. गुन्हेगारांची हात मिळवणी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात दी. २५ रोजी अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी वेळीच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असता तर देशमुख यांची हत्या टळली असती, असा आरोपही देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला.
चांगल्या अधिकाऱ्यांबद्दल आमची काही तक्रार नाही. मात्र, आरोपींशी हातमिळवणी करून त्यांना वाचविणाऱ्यांबद्दल चौकशी झाली पाहिजे. त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. प्रशांत महाजन आणि राजेश पाटील या दोन पोलीस अधिकाऱ्यांना याप्रकरणी सह आरोपी केले पाहिजे, या आपल्या मागण्या आहेत. या मागण्या आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवाव्यात, अशा अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केल्या.
महाजन हे केवळ पंधरा मिनिटात घटनास्थळी पोहोचले होते. मात्र, आरोपींना गावकऱ्यांपासून वाचविण्यासाठी त्यांनी आम्हाला घटनास्थळाचा खोटा पत्ता दिला, असा आरोप करतानाच राजेश पाटील वाल्मीक कराडला भेटायला का गेले, असा सवाल धनंजय देशमुख यांनी केला. त्याचप्रमाणे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपास सुपूर्द केल्यानंतर केज पोलिसांनी त्यांना सहकार्य केले नाही. कोणतेही पुरावे तपास यंत्रणेला दिले नाहीत. गावकऱ्यांनीच यंत्रणेला सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून दिले, असेही ते म्हणाले.
या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे हा त्याच्यावर यापूर्वीच दाखल असलेल्या गुन्ह्यातही फरार आहे. प्रत्यक्षात तो याच परिसरात सातत्याने वावरत असल्याचे स्पष्ट आहे. पोलिसांच्या आशीर्वादानेच हे शक्य झाल्याचा दावाही गावकऱ्यांनी केला.