Indian Girl Fights Death in US | वडगांव (उंब्रज) येथील अपघातग्रस्त मुलीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज!

वडिलांना व्हिसा मिळेना ; केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा

Indian Girl Fights Death in US | वडगांव (उंब्रज) येथील अपघातग्रस्त मुलीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज!

उंब्रज / प्रतिनिधी
     

कराड तालुक्यातील वडगाव (उंब्रज) येथील सहयाद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक संजय विठ्ठल कदम यांची भाची नीलम तानाजी शिंदे हीचा अपघात अमेरिकेमध्ये शुक्रवार दि. १४ फेब्रुवारी रोजी झाला असून याची माहिती कुटुंबियांना रविवार १६ फेब्रुवारी रोजी समजली. प्राप्त माहितीनुसार नीलम हिची परिस्थिती नाजूक असून डोक्याला मार लागल्याने तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली आहे. याबाबतचा मेल संबधित रुग्णालयाने तातडीने कुटुंबियांना पाठविला असून नजीकच्या सदस्यांना तातडीने अमेरिकेत येण्याची सूचना केली आहे. पंरतु वडिलांना तातडीने व्हिसा मिळत नसल्याने वडगांव (उंब्रज) येथील कुटुंबाची  मुलीच्या काळजीने अवस्था बिकट झाली आहे. 
       

दरम्यान कुटुंबीयांनी व्हिसा मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ,माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील याच्या माध्यमातून संपर्क साधला असून याबाबत कुटूंबाची अमेरिकरत जाण्यासाठी व्हिसा मिळावा याबाबत धावपळ सुरू आहे. परंतु तांत्रिक अडचणीमुळे मुलीची वडिलांची भेट दुरावली आहे. तर काही दिवसांपूर्वी नीलम हिच्या आईचेही निधन झाले असल्याने वडिलांची अवस्था बिकट झाली आहे. यामुळे केंद्र सरकारने याबाबत मदतीचा हात पुढे करून बाप लेकीची होणारी ताटातूट वाचवण्यासाठी पावले उचलणे गरचेचे आहे.  तसेच सर्व प्रकारे वैद्यकीय मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले करण्याची अपेक्षा कदम कुटुंबिय व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. 
   

याबाबत अधिक पत्रकारांना माहिती देताना मुलीचे वडील तानाजी शिंदे म्हणाले, अत्यंत तातडीच्या आणि भावनिकरीत्या गंभीर परिस्थितीतून हे पत्र पाठवत आहे. माझ्या मुलीचा नीलम शिंदे (वय वर्षे ३५) हिचा १४ फेब्रुवारी २०२५ रोजी गंभीर अपघात झाला असून, ती सध्या UC Davis Medical Center, Sacramento, California येथे अतिदक्षता विभागात दाखल आहे. तिची स्थिती अत्यंत नाजूक असून ती कोमामध्ये आहे.
     

रुग्णालय प्रशासनाने आम्हाला तातडीने अमेरिकेत येऊन तिच्या उपचारांदरम्यान उपस्थित राहण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, तिची काळजी घेण्यासाठी तिथे आमच्या कुटुंबातील कोणीही नाही. आम्हाला त्वरित तिथे पोहोचण्याची गरज आहे, पण व्हिसा प्रक्रियेमध्ये होणाऱ्या विलंबामुळे आम्ही अत्यंत कठीण परिस्थितीत आहोत.यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ,माजी खासदार श्रीनिवास पाटील,माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी मदतीचा हात दिला असून प्रशासकीय पातळीवर संपर्क करण्याचा प्रयत्न आहे. 
 

माझ्या नातेवाईक गौरव कदम व मला तातडीचा व्हिसा मिळावा, अशी आमची कळकळीची विनंती आहे. गेल्या ७-१० दिवसांपासून आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत, परंतु कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही. रुग्णालयाने अधिकृत पत्र दिले असले तरी, ते US कौन्सुलर ऑफिस, मुंबईपर्यंत पोहोचवण्यात अडथळे येत आहेत.
 

या संपूर्ण परिस्थितीमुळे आम्ही मानसिक व शारीरिकदृष्ट्या अत्यंत तणावाखाली आहोत. माझ्या मुलीच्या जीविताला धोका असून, तिचे वडील प्रचंड मानसिक तणावात आहेत. आम्ही आपली मदत अपेक्षित ठेवतो आणि आमच्या प्रकरणाची तातडीने दखल घेत व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करावा अशी विनंती केली आहे.

 

000

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us