उशाशी मोबाईल ठेऊन झोपल्याने होतो कर्करोग?
जागतिक आरोग्य संघटनेने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
वॉशिंग्टन: वृत्तसंस्था
रात्री झोपताना उशाशी मोबाईल ठेऊन झोपल्यास मेंदूचा कर्करोग होत असल्याचे इशारे देणारे संदेश समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर फिरत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने या शक्यतेचा स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे. मात्र, मोबाईल मधून होणाऱ्या नीलकिरणांच्या उत्सर्जनामुळे झोपेत येणारे अडथळे आरोग्य विषयक गंभीर समस्यांचे कारण ठरू शकतात, याकडेही संघटनेने लक्ष वेधले आहे.
रात्री झोपण्यापूर्वीच्या निवांत वेळेत मोबाईलचा वापर करून काही नवीन माहिती मिळवणे किंवा मनोरंजन करून घेणे, ही अनेकांची सवय बनली आहे. त्यानंतर सहाजिकच मोबाईल झोपताना उशीखाली सरकवला जातो. मोबाईलवर लावलेला गजर ऐकून उठण्यासाठीही अनेक जण डोक्याजवळ मोबाईल ठेवतात. मात्र, मोबाईलमधून होणाऱ्या किरणोत्सगामुळे झोपताना डोक्याजवळ मोबाईल ठेवल्यास मेंदूचा कर्करोग होतो, असा दावा करणारे संदेश समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने मात्र संशोधनांती या शक्यतेचा इन्कार केला आहे.
इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर या संशोधन संस्थेच्या सहकार्याने जागतिक आरोग्य संघटनेने यावर केलेल्या संशोधनातून महत्त्वपूर्ण निष्कर्ष दिसून आले आहेत. मोबाईल डोक्याशी ठेवून झोपल्यामुळे त्यातून होणारा किरणोत्सर्ग मेंदूचा कर्करोग अथवा मृत मेंदूला कारणीभूत ठरतो, या दाव्याला संशोधनातून कोणतीही पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे हा दावा फोल असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.
मात्र, रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर केल्याने त्यातून होणाऱ्या नील किरणांच्या उत्सर्गामुळे झोप लागण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात. त्याचप्रमाणे मोबाईल वापरानंतर लागलेली झोप आरोग्यपूर्ण गाढ झोप नसते. अपुरी आणि अशांत झोप ही अनेक गंभीर आजारांसाठी कारणीभूत ठरते. काही वेळा ते जीवघेणेही असू शकतात, याची जाणीव देखील जागतिक आरोग्य संघटनेने करून दिली आहे.
Comment List