न्यायालयाच्या आदेशानंतर राजीनाम्याबाबत निर्णय

माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांचा खुलासा

न्यायालयाच्या आदेशानंतर राजीनाम्याबाबत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी

फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी कारावासाची शिक्षा झालेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत न्यायालयाच्या आदेशानंतर निर्णय घेण्यात येईल, असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केला. 

माजी पंतप्रधान आणि जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करून अधिवेशनाचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर लगेचच माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेऊन गदारोळ सुरू केला. 

ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या श्रद्धांजलीनंतर लगेचच असा गदारोळ होणे अपेक्षित नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. कोकाटे यांच्या राजीनामा बद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, यासंदर्भात न्यायालयाने सुनावणी पूर्ण केली असून अंतिम निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणी निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी सन 1995 मध्ये खोटी कागदपत्र सादर करून मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका मिळवल्याबद्दल माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कोकाटे बंधूंना दोन वर्ष कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी विरोधकांची आग्रही मागणी आहे. 

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us