'... म्हणून पक्षात होत आहे मुंडे यांना वाचविण्याचा प्रयत्न'

करुणा शर्मा यांचा छातीठोक दावा

'... म्हणून पक्षात होत आहे मुंडे यांना वाचविण्याचा प्रयत्न'

मुंबई: प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हा केवळ अजित पवार गट नाही तर धनंजय मुंडे गट आहे. पक्षावर धनंजय मुंडे यांची मजबूत पकड आहे. त्यामुळे अनेक गंभीर आरोप असूनही त्यांचा राजीनामा घेण्याऐवजी त्यांना वाचविण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे. मात्र, पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतला असून दोन दिवसात त्यावर निर्णय घेतला जाईल, याचा पुनरुच्चारही शर्मा यांनी केला. 

धनंजय मुंडे यांचा आपल्या पक्षात मोठा दबदबा आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत नेत्यांच्या मध्ये नाही. मुंडे यांचे पक्षातील वजन आपण जवळून बघितले आहे. मात्र, त्यांच्यावरील आरोप गंभीर असल्यामुळे बाहेरून येणाऱ्या दबावाबरोबरच पक्षातील काही मंडळी देखील मुंडे यांच्या राजीनामाची मागणी करू लागली आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी मुंडे यांचा राजीनामा घेतला आहे. मंत्रिमंडळातील काही लोकांकडून आपल्याला ही माहिती मिळाली आहे, असे शर्मा यांनी सांगितले. 

मुंडे यांच्याकडून राजीनामा घेण्याबाबत पक्षातील नेत्यांची काय प्रतिक्रिया उमटते, त्यांचा राजीनामा मंजूर केल्यास पक्षाचे आमदार आणि खासदार यांची प्रतिक्रिया काय असेल, याचा अंदाज घेण्यासाठी हा राजीनामा घेण्यात आला आहे. नेत्यांच्या प्रतिक्रियेचा अंदाज घेऊन राजीनाम्याबाबत पुढे निर्णय घेतला जाईल, असेही त्या म्हणाल्या. 

धनंजय मुंडे यांच्या राजीनामाच्या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. मात्र, अद्याप त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. आपण त्यांना पुन्हा एक स्मरणपत्र पाठवणार आहोत. त्याचप्रमाणे अधिवेशन काळात विधिमंडळात जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, आमदार सुरेश धस यांच्यासोबत राहून, मुंडे यांच्यासारखे लोक मंत्रिमंडळात नको, यासाठी महाराष्ट्रात जनजागृती करणार आहोत, असेही शर्मा यांनी सांगितले. 

 

 

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us