विधानसभेत धुमश्चक्री, अधिवेशनकाळात अबू आझमी निलंबित

क्रूरकर्मा औरंगजेबाची भलामण भोवली

विधानसभेत धुमश्चक्री, अधिवेशनकाळात अबू आझमी निलंबित

मुंबई: प्रतिनिधी 

स्वतःचा जन्मदाता पिता आणि भावांसह अनेकांच्या निर्घृण हत्या करणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबाची भलामण करणे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना भोवले आहे. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना त्यांच्यावर एकमताने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अधिवेशन काळात विधिमंडळाच्या इमारती प्रवेश करण्यासही त्यांना मनाई करण्यात आली आहे. 

महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा मानबिंदू असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत अमानुषपणे हत्या करणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी पाव शतकाहून अधिक काळ महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेल्या औरंगजेबाची उत्तम शासक म्हणून आजमी यांनी भलामण केली होती. त्याचे पडसाद कालपासूनच विधिमंडळात उमटायला सुरुवात झाली. 

ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आजमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी अनुमोदन दिले. त्याच वेळी या प्रस्तावाला पाठिंबा देताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानाबाबतही कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर सभागृहात गदारोळ माजला. 

हा गोंधळ सुरू असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आवाजी मतदान घेतले आणि आजमी यांच्या निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव एकमताने मंजूर झाल्याचे जाहीर केले. 

 

 

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us