'आम्हाला एक खून माफ करा'
महिला दिनी रोहिणी खडसे यांची राष्ट्रपतींकडे मागणी
मुंबई: प्रतिनिधी
सध्याच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाटण्यासारखी परिस्थिती असताना महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी, महिलांना एक खून माफ करावा, अशी मागणी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महिला दिनाचे औचित्य साधून खडसे यांनी राष्ट्रपतींना एक पत्र पाठवले आहे. हे पत्र त्यांनी समाज माध्यमांवरही प्रसिद्ध केले आहे. नुकत्याच मुंबई येथे बारा वर्षाच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचा उल्लेख करून खडसे यांनी पत्रात नमूद केले आहे की, आम्हाला एक खून माफ असावा. आम्हाला खून करायचा आहे बलात्कारी प्रवृत्तीचा, अत्याचारी मानसिकतेचा आणि निष्क्रिय कायदा सुव्यवस्थेचा.
नुकताच एक आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्या अहवालात स्त्रियांसाठी भारत हा आशिया खंडातील सर्वाधिक असुरक्षित देश असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण, अपहरण, कौटुंबिक हिंसाचार अशा अनेक बाबीही विचारात घेण्यात आल्या आहेत.
देश संकटात असताना महाराणी ताराबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देखील तलवार हातात घेतली होती. मग समाजात अपप्रवृत्ती वाढत असताना आम्ही तरी मागे का राहावे, असा सवालह खडसे यांनी आपल्या पत्रात केला आहे.
Comment List