'धनुष्य बाण काँग्रेसच्या पायाशी गहाण टाकला म्हणून...'
एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
मुंबई: प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या काँग्रेसला आपल्यापासून लांब ठेवले त्याच काँग्रेसच्या पायाशी तुम्ही धनुष्यबाण गहाण ठेवले. म्हणूनच एकनाथ शिंदे यांनी उठाव केला. म्हणूनच शिवसैनिक तुमच्यापासून लांब जाऊन खऱ्या शिवसेनेत परत येत आहेत. आता किती जण शिल्लक राहतील ते सांगता येत नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
महापालिका निवडणुका समोर दिसत असतानाच मुंबईच्या पश्चिम उपनगरातील माजी नगरसेवक राजू पेडणेकर आणि संजय पवार यांनी उद्धव ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' करून शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या बरोबर शेकडो शिवसैनिकही शिंदे गटात आले आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सर्वांचे स्वागत केले.
विधानसभा निवडणुकीपूर्वी अडीच वर्ष महायुतीचे सरकार राज्यात कार्यरत होते. या काळात आपण अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. मुंबईत अनेक विकास कामे होत आहेत. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार मोठ्या प्रमाणावर निवडून आले. आतापर्यंत पक्षाचे एवढे आमदार कधीच निवडून आलेले नव्हते, असा दावा शिंदे यांनी यावेळी केला.
तुम्ही सन 2019 मध्ये सर्वसामान्य मतदारांची फसवणूक केली. बेईमानी केली. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी तुमच्या दांड्या गुल केल्या. तुम्ही आमच्यावर अनेक आरोप केले. टीका केली. शिवीगाळ केली. मात्र, आमचे 80 पैकी 60 आमदार निवडून आले. आणि तुमचे केवळ वीस. मग खरी शिवसेना कोणाची? ती शिवसेना फतव्यांची, उठ म्हटलं की उठ, बस म्हटलं की बस वाल्यांची, अशा शब्दात शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबद्दल होणाऱ्या टीकेचा समाचारही शिंदे यांनी घेतला. आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी दिल्लीला जातो. तुम्ही राहुल गांधींना मुजरे घालण्यासाठी दिल्ली दौरे करता. कोणीतरी म्हटले आहे की शिवसेनेला मोदी, शहा यांचे नाव द्या. आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल आदर आहेच. त्यांनीच काश्मीरमधील कलम 370 रद्द केले, अयोध्येत राम मंदिराची उभारणी केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची स्वप्न पूर्ण केली, असेही शिंदे म्हणाले.
Comment List