आता पंकजा मुंडे सुरेश धस यांच्या रडारवर
बीडच्या दोन्ही नेत्यांमध्ये रंगला कलगीतुरा
मुंबई: प्रतिनिधी
संतोष देशमुख हत्याप्रकरणासह धनंजय मुंडे यांच्या विरोधात विविध आरोपांची तोफ डागणारे आमदार सुरेश धस यांनी आता आपला मोर्चा आपल्याच पक्षातील मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे वळवला आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा देईपर्यंत पंकजा मुंडे यांनी त्यांच्या विरोधात चकार शब्द काढलेला नाही. याबद्दल आपण त्यांच्या विरोधात पक्ष नेतृत्वाकडे लेखी तक्रार करणार आहोत, असा इशारा धस यांनी दिला आहे. त्यानंतर आता सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
पंकजा मुंडे यांनी देखील धस यांना प्रत्युत्तर देताना, मी भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय नेता असताना देखील धस आपल्यावर आरोप करीत आहेत. त्याबद्दल पक्ष नेतृत्वाने त्यांना कडक शब्दात समज द्यावी, अशी मागणी केली आहे.
सगळीकडे कॅमेरे बरोबर घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी धनंजय मुंडे यांची भेट लपून छपून का घेतली, असा सवाल मुंडे यांनी केला तर, कॅमेरे माझ्या मागे येतात. त्यांनी कुठे यावे हे मी ठरवत नाही, असे उत्तर धस यांनी दिले आहे.
धनंजय मुंडे पालकमंत्री असताना सुद्धा वाल्मीक कराड त्यांच्यासाठी काम करत होता. त्यावेळी देखील धस हे आमदार होते. मग त्यांनी त्याच वेळी कराड याच्या विरोधात एकही तक्रार का केली नाही, असा सवाल मुंडे यांनी केला आहे. मी मंत्री झाल्यावर अचानकच धस यांना बीडमध्ये वाढती गुन्हेगारी दिसून आली का, असा प्रश्नही त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन काळातच याप्रकरणी कारवाईचे आश्वासन दिलेले असून देखील धस यांनी हे प्रकरण सभागृहाबाहेर का पेटते ठेवले आहे, असा पंकजा मुंडे यांचा सवाल आहे तर, संतोष देशमुख हे भाजपचे बूथ प्रमुख होते. त्यांच्यासाठी आपण हे प्रकरण पेटत ठेवणारच, असे प्रत्युत्तर धस यांनी दिले आहे.
Comment List