'हे सगळे नेते तयार झाले तुमच्याच तालमीत... '
बीड वरील टिप्पणीवरून अंजली दमानिया यांचा शरद पवार यांना टोला
मुंबई: प्रतिनिधी
बीड जिल्ह्याची गंभीर परिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत असलेले बहुतेक सर्वच राजकीय नेते तुमच्याच तालमीत तयार झालेले असल्याचा टोला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना लगावला आहे.
बीड जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांबाबत शरद पवार यांनी नुकतेच एक विधान केले आहे. एकेकाळी बीड हा अत्यंत शांत जिल्हा होता. सर्वांना बरोबर घेऊन जाणार होता. सध्याच्या काळात बीडची परिस्थिती खूपच गंभीर झाली आहे. यापूर्वी तो असा कधीच नव्हता, असे विधान पवार यांनी केले. या विधानावर दमानिया यांनी पवार यांच्यावरच पलटवार केला आहे.
ज्या राजकीय नेत्यांच्या 'कर्तृत्वा'मुळे बीड जिल्ह्याची परिस्थिती गंभीर झाली आहे, त्यापैकी राज्य मंत्रिमंडळातील पंकजा मुंडे वगळता धनंजय मुंडे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे किंवा जुन्या नेत्यांपैकी जयदत्त क्षीरसागर हे सर्व नेते तुमच्याच तालमीत तयार झाले आहेत. हे सगळे तुमच्याच गटात होते. त्या सर्वांना मोठे करण्यात तुम्हीच हातभार लावला आहे, अशी टीका जमानिया यांनी पवार यांच्यावर केली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड याच्या जवळचे असलेल्या काही पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबद्दलची माहिती, त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांची माहिती सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्याकडे आहे. त्याबाबत पोलिसांनी देसाई यांना नोटीस बजावली असून सोमवारी त्या पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन त्यांच्याकडची माहिती पोलिसांना देतील. पोलिसांनी या माहितीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, असेही दमानिया म्हणाल्या
Comment List