'स्वतः कुणाची छेड काढणार नाही, दुसऱ्याने छेड काढली तर...'
भारतीय सैन्याचे अण्णा हजारे यांनी केले कौतुक
शिर्डी: प्रतिनिधी
भारत स्वतः कोणाची छेड काढणार नाही पण भारताची कुणी छेड काढली तर त्याला कधी सोडणार नाही, असे उद्गार काढत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे. यापुढे भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याचे धाडस कोणी दाखवणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीर मधील नऊ ठिकाणांचे दहशतवादी तळ उध्वस्त करून घेतला आहे. भारताच्या या कारवाईचे देशभरात समर्थन केले जात आहे.
लष्कराने एवढी उत्तम कारवाई केली आहे की त्याचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे. दहशतवाद्यांनी विनाकारण 26 निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. त्यांना न्याय देण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूरची कारवाई केली आहे. त्यामुळे या कारवाईच्या विरोधात कोणी काही बोलू शकत नाही, असे अण्णा हजारे यांनी सांगितले.
भारतीय सैन्याने पाकिस्तानातील ९ ठिकाणी हल्ले करून तीन दशकांपासून सुरू असलेले दहशतवादी अड्डे उध्वस्त केले आहेत. त्यात शेकडो दहशतवादी यमसदनी गेल्याचा दावा करण्यात येत आहे. दहशतवादाच्या विरोधात सर्व देशांनी संघटित होऊन पावले उचलण्याची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.