'आता आपले म्हणणे उच्च न्यायालयात मांडणार'
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे प्रतिपादन
मुंबई: प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात कोणीतरी आमदार कृषी घोटाळ्यांसारख्या गैरप्रकारांवर बोलेल, त्यांच्या चौकशीची मागणी करेल, अशी आपल्याला अपेक्षा होती. त्यामुळे अधिवेशन संपेपर्यंत आपण त्यासाठी वाट पाहिली. मात्र, त्याबद्दल सभागृहात कोणीही बोलले नाही. त्यामुळे या सर्व घोटाळ्यांना आपण न्यायालयाच्या माध्यमातून वाचा फोडणार आहोत. यापुढे आपले म्हणणे आपण उच्च न्यायालयासमोर मांडू, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दमानिया यांनी मोठ्या प्रमाणावर आवाज उठवला. याच कालावधीत त्यांनी विशेषतः धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात झालेले कृषी घोटाळ्यासह अनेक कथित घोटाळे उघड केले आहेत. अधिवेशन काळात या घोटाळ्यांना वाचा फोडण्यासाठी कोणीही प्रयत्न न केल्यामुळे न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्याचे दमानिया यांनी सांगितले आहे.
कबुली पोलिसांसमोर की दंडाधिकाऱ्यांसमोर?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी सुदर्शन घुले याने देशमुख यांची हत्या केल्याचा कबुली जबाब दिला आहे. मात्र, घुले याचा हा जबाब पोलिसांसमोर देण्यात आला की दंडाधिकाऱ्यांसमोर, हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे दमानिया यांनी निदर्शनास आणून दिले. घुले आणि हा जबाब जर पोलिसांसमोर दिला असेल तर त्याला विशेष महत्त्व देता येणार नाही. मात्र, त्याने हा जबाब जर दंडाधिकाऱ्यांसमोर दिला असेल तर खटला निकाली झाल्यात जमा आहे, असे त्या म्हणाल्या. घुले यांनी कलम 164 नुसार कबुली दिली असेल तर ते चांगले आहे, असे त्यांनी नमूद केले.
बीडमधील सर्वच नेते बॅकफूटवर
देशमुख हत्या प्रकरणी तसेच एकनाथच धनंजय मुंडे यांच्या विरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेणारे आमदार सुरेश धस यांच्यासह बीडमधील सर्व नेते बॅकफूटवर आले आहेत. याचे कारण प्रत्येक जण आपापल्या जागी अशीच कृत्य करीत आहेत. त्यांची प्रकरणे ही बाहेर निघत आहेत. आपण तोंड उघडले तर आपली आणखी प्रकरणेही बाहेर निघतील, अशी भीती त्यांच्या मनात आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळात सुरेश धस किंवा आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे हे गप्पच असलेले आपल्याला बघायला मिळतील, असा टोला देखील दमानिया यांनी लगावला.